गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या राज्य युवाशक्ती प्रमुखपदी मांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक शांताराम च्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्य आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव तसेच कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
च्यारी हे पारंपरिक सुतारकाम व्यवसायाशी निगडित असून संघ स्वयंसेवक म्हणूनही सक्रिय आहेत. १९९६ साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलामध्ये त्यांनी विविध पदांची जबाबदारी पार पाडली. यामध्ये मांद्रे पंचायत प्रमुख, पेडणे तालुका सहसंयोजक, राज्य संयोजक, राज्य सहमंत्री, रामसेतू बचाव अभियानाचे राज्य प्रमुख तसेच राज्य संघटनमंत्री अशा अनेक पदांचा समावेश आहे.
याशिवाय भा.भा.सु. मंचाच्या ‘गोवा सुरक्षा मंच’ या पक्षाचे पूर्णकालिक राज्य संघटक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आगामी मराठी युवाशक्ती मेळाव्यांच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१० मध्ये गोव्यातील अनेक हिंदू मंदिरांमध्ये दैवतांच्या मूर्तींच्या विद्ध्वंसाच्या घटनांनी चिंता वाढली होती. त्यावेळी जनजागरण घडवून आणण्यासाठी झालेल्या आंदोलनात विनायक च्यारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तपोभूमीचे पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पणजी कांपाल मैदानावर झालेल्या पंधरा हजारांच्या सभेच्या आयोजनामध्येही ते चार युवा संघटक नेत्यांपैकी एक होते.
२०११-१२ आणि २०१५-१७ या काळात भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनांतही त्यांनी आघाडी घेतली होती. त्यांच्या नियुक्तीची माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.