गोवा खबर : शुभावती भोबे यांनी विवेकानंद केंद्राला समर्पित केलेले विवेकानंद भवन ही गोव्यासाठी अत्यंत मोठी व मौल्यवान देणगी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पर्वरी येथे विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी आयोजित नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी सरपंच स्वप्नील चोडणकर तसेच विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, स्वतःसाठी जगणारे फक्त जगतात; पण समाजासाठी जगणारे कायम स्मरणात राहतात. स्वामी विवेकानंदांचे विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी संपूर्ण जीवन राष्ट्राला वाहिले. कन्याकुमारी शिला स्मारक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे भेट देणाऱ्यांना मिळणारी ऊर्जा आणि शांतता ही देशासाठी प्रेरणा ठरते.
यावेळी त्यांनी शुभावती भोबे यांच्या उदार दातृत्वाचे कौतुक केले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, विवेकानंद भवन हे पर्वरीसाठी एक भूषण आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमांतून तरुण पिढीपर्यंत स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचतील. या भवनामुळे केवळ युवकांना दिशा मिळणार नाही, तर संपूर्ण पर्वरी परिसराला एक नवी ऊर्जा आणि सकारात्मकता प्राप्त होईल.
नामफलक अनावरण व दातृत्वाचा गौरव
कार्यक्रमाची सुरुवात विवेकानंद भवनाच्या नामफलकाचे अनावरण करून करण्यात आली. त्यानंतर एकनाथजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
शुभावती भोबे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा सन्मान त्यांच्या मानसपुत्र संजीव सावर्डेकर यांनी स्वीकारला.
या प्रसंगी रुपाली डोईफोडे व करुणा म्हावळींगकर यांनी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात व समाप्ती केली. मान्यवरांचा परिचय वल्लभ केळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन स्नेहा जांबोटकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन पूजा बर्वे यांनी मानले.