Connect with us

गोवा खबर

गोव्यातील सर्व दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा मर्दनगड संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील सर्व गड किल्ले, तसेच गड किल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्ो यांसाठी मर्दनगड संवर्धन समितीने संघटित आणि प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्दनगड संवर्धन समितीची नुकतीच ढवळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

या बैठकीला मर्दनगड संवर्धन समितीचे राजेंद्र देसाई व सुप्रिया केतकर,‘बजरंग दला’चे गोवा राज्य संयोजक सर्वश्री विराज देसाई, इतिहासकार सचिन मदगे, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक, गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नारायण नावती, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, संकेत आर्सेकर, तसेच गोव्यातील इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, कलाप्रेमी आणि आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थित होती. फोंडा येथील मर्दनगडच्या संवर्धनासाठी केलेल्या कामाची माहिती देणे आणि भविष्यातील अशा उपक्रमांसाठी दिशा ठरवणे या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या प्रारंभी सत्यविजय नाईक यांनी मर्दनगड संवर्धन समितीने केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे महत्त्व विषद केले. बैठकीत शिवप्रेमी संघटनेचे इच्छित फळदेसाई यांनी दिवाळीनिमित्त राज्यस्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना मांडली आणि त्या स्पर्धेचा आराखडाही सादर केला. या उपक्रमाला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. या स्पर्धेमुळे तरुणांमध्ये ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जागरूकता वाढेल अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाची कार्यवाही, तसेच गड किल्ल्यांचे संवर्धनाच्या कार्य यांसाठी  ‘अखिल गोमांतक शिवप्रेमी संघटना’ या नावाने पुढीलप्रमाणे कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष सर्वश्री संकेत आर्सेकर, उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, सत्यविजय नाईक, कोषाध्यक्ष सुजय देसाई, तसेच सदस्य सुचेन्द्र अग्नी, जयेश थळी, विराज देसाई, मनोज गावकर, सुप्रिया केतकर, गोविंद गोवेकऱ, गौरिश कवळेकर आणि नवदिप नाईक. सल्लागार समितीमध्ये सर्वश्री नारायण नावती, नारायण नाडकर्णी, संजय देसाई, विश्वास प्रभू आणि  सचिन मदगे यांचा समावेश आहे. या समित्या लवकरच आपल्या कामाला सुरुवात करून या कार्याला नवी दिशा देणार आहे.