-
राजेंद्र तालक यांची माहिती : कामावर दर १५ दिवसांनी होणार आढावा
गोवा खबर : मडगाव येथील रवींद्र भवनातील पाय तियात्रिस्त सभागृह, ब्लॅक बॉक्स आणि जोड इमारतीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. हे काम व्यवस्थित आणि समाधानकारक पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी रवींद्र भवन कार्यकारी मंडळाने नाट्यदिग्दर्शक व कलाकार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या समितीत अॅकोस्टिक सल्लागार प्रशांत वराडकर, आर्किटेक्ट व कृती दलाचे सदस्य राजन भिसे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे विविध अधिकारी सामील आहेत.
तालक म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे आणि आमदार दिगंबर कामत यांच्या पुढाकारामुळे हे काम लवकर सुरू करता आले. निविदा प्रक्रियेतील अडथळे दूर करून काम तातडीने सुरू करण्यास मदत झाली. ६० दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
ही समिती दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे. नाट्यगृह व ब्लॅक बॉक्सच्या कामाची गुणवत्ता व वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.
कलाकार, निर्माते आणि प्रेक्षकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात हीच आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत मिळालेल्या सहकार्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री व संबंधित विभागांचे आभारी आहोत, असे तालक यांनी सांगितले.