-
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
गोवा खबर : पेडणे तालुक्यातील मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जीएमआर कंपनीच्या सहकार्याने ब्ल्यू कॅप टॅक्सी काउंटरला १५व्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावर नेण्यात आले आहे. यामुळे भूमिपुत्रांना न्याय मिळाला असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांपासून जीएमआर कंपनीने ब्ल्यू कॅप टॅक्सी काउंटर बंद ठेवला होता. या काळात टॅक्सी व्यावसायिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वाहतूक मंत्री माविन गुदिनो यांची भेट घेऊन समस्या मांडल्या आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार आर्लेकर यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री व जीएमआर व्यवस्थापन यांच्यासमोर ठेवला.
सरकारने टॅक्सी काउंटर सुरू केला खरा, मात्र तो १५व्या क्रमांकावर दिल्यामुळे प्रवाशांकडून ग्राहक मिळवताना टॅक्सी व्यावसायिकांना मोठ्या अडचणी येत होत्या. परिणामी त्यांनी पुन्हा आमदार आर्लेकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हा काउंटर पहिल्या क्रमांकावर आणण्याची मागणी केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.
त्यावर आमदार आर्लेकर यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री व जीएमआरशी चर्चा करून प्रश्न सोडवला. टॅक्सी व्यावसायिकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या असून अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत, असे आर्लेकर म्हणाले.