-
२३ ऑगस्ट रोजी कार्यक्रमात होणार चावी सुपूर्द : रमेश तवडकर
गोवा खबर : श्रमधाम उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या ३० नव्या घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तवडकर म्हणाले, २३ ऑगस्ट रोजी पणजी येथील कला अकादमी सभागृहात या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्री उपस्थित राहतील.
आतापर्यंत या उपक्रमातून ४० घरे बांधली गेली आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी २० घरे बांधली गेली होती. तिसऱ्या टप्प्यात आता आणखी ३० घरे पूर्ण झाली आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी ही घरे मालकांच्या ताब्यात दिली जातील.
“समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे घर मिळावे हा श्रमधाम योजनेमागचा उद्देश आहे. पेडणेपासून धारबांदोड्यापर्यंत आणि काणकोणपासून मुरगावपर्यंत हा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत दीड हजार स्वयंसेवक जोडले गेले असून पाच हजार स्वयंसेवक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” असे तवडकर यांनी सांगितले.
या घरांची सरासरी ७० ते ८० चौ. मी. जागेत बांधणी केली असून प्रत्येकी अंदाजे १५ लाखांचा खर्च आला आहे. या कार्यक्रमात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही तवडकर यांनी केले.