गोवा खबर : गोव्यात मंत्रिमंडळ फेरफाराच्या चर्चेत व्यस्त असताना, नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्ली भेट दिली. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
विश्वजीत राणे यांच्या हातात वन खाते आहे आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत वन विषयक धोरणांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये गोव्यात खारफुटी क्षेत्राचे संवर्धन आणि विस्तार, तसेच पाच लाख विविध झाडे लावण्याची मोहिम हाती घेण्याचा निर्णय झाला.
राणे यांनी सांगितले की, दिल्ली भेटीदरम्यान त्यांना कळाले की, चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळ फेरफार होणार नाही. तसेच नड्डा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. राणे यांनी भूपेंद्र यादव यांना गोव्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे, जिथे वन आणि पर्यावरण विषयांवर पुढील चर्चा होईल.