Connect with us

गोवा खबर

मुंगूल गोळीबार प्रकरणात १८ संशयित अटक; पोलिसांची शोध मोहीम सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : फातोर्डा पोलिसांनी मुंगूल गोळीबार प्रकरणात शुक्रवारी इम्रान बेपारी (३८, रा. सांताक्रुझ), अक्षय तलवार (२२, रा. बोर्डा), अविनाश गुंजीकर (३१, रा. नावेली), परशुराम राठोड (३२, रा. बेळगाव) आणि दीपक कट्टीमणी (रा. मडगाव) यांना अटक केली. यामुळे या प्रकरणातील एकूण अटक झालेल्या संशयितांची संख्या १८ झाली आहे. तरीही अद्याप तीन ते चार फरार संशयितांचा शोध पोलिस करत आहेत.

शनिवारी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रकरणात वापरल्या गेलेल्या सहा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यात बलेनो, थार, फ्रॉक्स, डस्टर आणि सुझुकी एक्सएल यांचा समावेश आहे. तसेच मारामारीत वापरलेले कोयते जप्त करण्यात आले, परंतु दोन गोळ्या झाडण्यात आलेल्या पिस्तुल अद्याप पोलिसांना सापडले नाहीत.

शनिवारी सकाळी अटक केलेल्या संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना मडगाव प्रथम वर्ग न्यायालयात सादर केले, जिथे त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अधीक्षक सिंग यांनी सांगितले की, फरार तीन ते चार संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके तयार आहेत. या पथकांद्वारे फरारांच्या घरच्यांचा आणि संपर्कात असलेल्या लोकांचा तपास केला जात आहे. अटक केलेले पाच जण हल्ल्यानंतर कर्नाटकात पळ काढले होते. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस पथकाने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून गोव्यात आणले.

सध्या अटक केलेले १८ संशयित हे इमरान बेपारी, अक्षय तलवार, अविनाश गुंजीकर, जॉयस्टॅन फर्नांडिस, परशुराम राठोड, अमर कुलाल, ताहीर मोहम्मद, रसूल शेख, विल्सन कारवालो, शाहरुख शेख, मोहम्मद अली, सुरज, गौरंग, वासू, मलिक, सुनील बिलावर आणि दीपक कट्टीमणी आहेत.