गोवा खबर:आज दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालय, मडगाव येथील माथानी साल्ढणा प्रशासकीय संकुलात ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आमदार श्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रीय तिरंगा फडकविला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार श्री कामत यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जगातील अनेक राष्ट्रांनी म्हटले होते की भारत कधीही एकसंध राहू शकणार नाही, परंतु प्राचीन कलेत रुजलेली भारताची संस्कृती भारताला एकसंध ठेवत आहे आणि आजपर्यंत तो जगातील नंबर वन राष्ट्र बनण्याच्या मार्गावर पुढे जात आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली भारत सर्वांगिण विकासाच्या मार्गावर आहे. भारताने विविध क्षेत्रात मिळविलेली प्रतिष्ठा आणि या क्षेत्रातील विकासाचा प्रवास इतर देश आश्चर्याने पाहत आहेत. संपूर्ण जगाला आश्चर्य वाटते की भारत कसा पुढे जात आहे, असे श्री कामत म्हणाले.
पुढे बोलताना श्री कामत यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या नेतृत्वाने जगावर आपली छाप सोडली आहे. सामान्य लोकांना लक्षात ठेवून आणि त्यांच्या गरजा ओळखून त्यांनी विविध योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत आणि आज कोट्यवधी भारतीय त्यांचा लाभ घेत आहेत. गरीब कल्याण योजनेअंतर्गत सुमारे ८० कोटी लोकांना मोफत धान्य देऊन मोफत रेशन दिले जात आहे. आजपर्यंत ५६.८१% लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेद्वारे, भारत सर्वात जास्त लोकांना मोफत रेशन देणारा पहिला देश बनला आहे असे ते म्हणाले.
आरोग्याशी संबंधित योजना आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी सरकारी निधी असलेली आरोग्य विमा योजना बनली आहे. १२ कोटी कुटुंबांमधील सुमारे ५५ कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या विविध योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कल्याणकारी योजना बनल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, देशाने व्होकल फॉर लोकल, सुविधांचा विकास, आत्मनिर्भर भारत, ऑपरेशन सिंदूर, वंदे भारत ट्रेन डिजिटलायझेशन आणि प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अशी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. महिलांना आर्थिक कल्याण साधण्यास मदत करण्यासाठी सरकार काम करीत आहे असे कामत यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवून, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही राज्याच्या आणि राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उत्कृष्ट काम करीत आहेत. स्वयंपूर्ण गोवा चळवळही महत्त्वाची बनली आहे. मुख्यमंत्री रोजगार योजना, म्हजे घर योजना, गृह आधार, लाडली लक्ष्मी, किसान क्रेडिट कार्ड, अटल आसरा योजना आणि आरोग्य योजना अशा विविध योजनांतर्गत नागरिकांना लाभ मिळत आहेत.
आमदार श्री कामत यांचे आगमन झाल्यावर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, श्रीमती एग्ना क्लींटस, आयएएस आणि दक्षिण जिल्हा पोलीस अधीक्षक, आयपीएस, श्री टिकम सिंग वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री कामत यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली.अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा बँडने राष्ट्रगीत वाजविले.
या कार्यक्रमात आमदार श्री आलेक्सियो रेजिनाल्ड लॉरेन्स आणि श्री उल्हास तुयेकर, मडगावचे नगराध्यक्ष श्री दामोदर शिरोडकर, नगरसेवक, अतिरिक्त जिल्हाधिकारी १, श्री श्रीनेत कोठवाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी २, श्री रमेश गावकर, पोलिस उपअधीक्षक श्री राजेंद्र प्रभुदेसाई, मडगावचे पोलिस निरीक्षक श्री सूरज सामंत, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी फातोर्डा येथील अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूल, रावणफोंड येथील लेफ्टनंट श्री विनायक शेणवी हायस्कूल आणि नुवे येथील मे डोस पोब्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.