गोवा खबर: कृषी मंत्री श्री रवी नाईक यांनी आज फोंडा येथील क्रांती मैदानावर ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली आणि राष्ट्रध्वज फडकविला आणि नंतर पोलिसांकडून मानवंदना घेतली.
या प्रसंगी बोलताना श्री रवी नाईक यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ आपण आज हा महत्वपूर्ण दिवस साजरा करीत आहोत असे सांगितले. आपण स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने आपले उत्पादन वाढविण्यासाठी आणि देशाला मदत करण्यासाठी आपण “मेड इन इंडिया” उपक्रमाला पाठिंबा दिला पाहिजे असे ते म्हणाले.
श्री रवी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्या देशाने उद्योग, शिक्षण, विमान वाहतूक इत्यादी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे असे सांगितले. भारत आता इतर कोणत्याही देशाला घाबरत नाही. आपल्या देशाचे संरक्षण आणि इतर सुरक्षा उपाय इतके मजबूत आहेत की कोणत्याही हल्ल्याच्या बाबतीत ते ताकदीने प्रतिक्रिया देऊ शकतात.
आपल्या देशाचा विकास आणि बळकटीकरण करण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी आपल्या पंतप्रधानांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी एनआरआय आयुक्त श्री नरेंद्र सावईकर, फोंडाचे नगराध्यक्ष श्री आनंद नाईक, स्वातंत्र्यसैनिक, अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक श्री शिवराम वायंगणकर, कमांडिंग ऑफिसर ६ टीटीआर, फोंडा कर्नल नीरज नवतियाल, सरपंच, नगरसेवक, नागरिक, सरकारी अधिकारी आणि विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.
सुरवातीस श्री रवी नाईक यांचे आगमन झाल्यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विशाल कुंडईकर आणि उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम श्री शुभम एम. नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.
गिरीश वेळगेंकर यांनी सूत्रसंचालन केले.