गोवा खबर : राज्यातील संस्कृती, परंपरा, धार्मिक विधी आणि साहित्य क्षेत्रात मराठी भाषेचे खोलवर अस्तित्व असतानाही, सरकारने अद्याप मराठीला राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे मराठीला कोंकणीसह दुसरी अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत शून्य तासावेळी केली.
त्यांची ही मागणी करताच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आक्षेप घेतला. शून्य तासात हा मुद्दा मांडणे अधिकृत भाषा कायद्याचे उल्लंघन असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी कायदा दुरुस्त करावा, असे सुचवले.
सरदेसाई यांनी आरोलकर यांना टोला लगावत, मराठीची मागणी करताना ते स्वतः कोकणीत बोलत आहेत, अशी टीका केली. यावर उत्तर देताना आरोलकर म्हणाले, मी मराठीला दुसरी अधिकृत भाषा करण्याचीच मागणी केली आहे. सरदेसाई यांनी ती नीट ऐकलेली नसावी.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत, शून्य तासात असा मुद्दा मांडण्यात काहीच अडचण नाही, असे स्पष्ट करत आरोलकर यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला.