गोवा खबर : मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी सरकारने ५ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आभार मानले असून, दोन ते तीन महिन्यांत या कामास सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी व्हाइसरीगल पॅलेसच्या देखभालीकडेही लक्ष वेधले.
विधानसभेत बोलताना आमोणकर यांनी ‘देवदर्शन योजना’ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच मुरगाव ते दोनापावल यामधील रो-रो फेरी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेशसुलभता मिळावी यासाठी रॅम्प, मदत डेस्क, हेल्पलाइन व दिव्यांगांसाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणीही झाली पाहिजे, असे आमोणकर यांनी स्पष्ट केले.
वेंझीचे आमदार व्हिएगश यांनी दिव्यांगांसाठी वर्षभर वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि ‘डे केअर’ सेवा सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.