गोवा खबर : राज्यातील वन्यजीवांच्या बचावासाठी आता खास प्राणी बचाव वाहने सज्ज करण्यात आली आहेत. सावर्डे येथे वनमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले.
वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यावर संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचतील आणि सरपटणारे अथवा अन्य वन्य प्राणी पकडून त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया राबवली जाईल.

या वाहनांमध्ये मरीन प्राणी बचाव वाहनाचा देखील समावेश आहे, जे कासवांसारख्या प्राण्यांच्या बचावासाठी वापरण्यात येईल. वाळवंट व डोंगराळ भागातही सहज चालणारी वाहने यामध्ये उपलब्ध आहेत.
या उद्घाटनप्रसंगी वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी कमल दत्ता, रमेश कुमार, प्रवीण राघव यांच्यासह स्थानिक सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.