Connect with us

गोवा खबर

तुये इस्पितळ गोमेकॉशी जोडणार : आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील तुये गावातील नव्याने बांधण्यात येणारे इस्पितळ आता थेट गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी (गोमेकॉ) इस्पितळाशी संलग्न केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण ग्वाही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या मागणीवरून ही घोषणा करण्यात आली.

आरोलकर यांनी मंत्री राणेंशी केलेल्या बैठकीत तुये इस्पितळाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. मंत्री राणे यांनी मांद्रे तालुक्यातील स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी मान्य केल्याचे आरोलकर यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला आरोग्य सचिव अरुणकुमार मिश्रा, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रुपा नाईक, तसेच स्थानिक आरोग्य अधिकारी अनिल मोरजकर आणि पूजा मडकईकर उपस्थित होते. इस्पितळासाठी अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

मांद्रे तालुक्यातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी हे आमचे उद्दिष्ट आहे, असे आमदार आरोलकर यांनी यावेळी सांगितले.