गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (17 रोजी) नवी दिल्ली इथे 8व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन केले.
राष्ट्रपती म्हणाल्या, पाणीटंचाई झेलणाऱ्या लोकांची संख्या त्यांना पुरेसा पाणी पुरवठा करून कमी करण्याचे ध्येय अखंड मानवतेसाठी अत्युच्च महत्त्वाचे आहे. शाश्वत विकासाच्या ध्येयांमध्ये स्थानिक समुदायांच्या सहभागाने पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापनाला पाठिंबा देऊन ते बळकट करण्यावर भर दिलेला आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या, प्रत्येकाला पाणी पुरवण्यासाठी व्यवस्था करणे आपल्या देशाच्या प्राधान्यक्रमावर प्राचीन काळापासून आहे. लदाखपासून केरळपर्यंत जल संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या परिणामकारक व्यवस्था आपल्या देशात अस्तित्वात होत्या. ब्रिटिश काळात या व्यवस्था हळूहळू लोप पावल्या. आपल्या व्यवस्था निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या होत्या. आपल्या प्राचीन पाणी व्यवस्थापन व्यवस्थांवर संशोधन करून त्यांचा आधुनिक संदर्भ लक्षात घेऊन व्यावहारिक वापर व्हायला हवा.

राष्ट्रपती म्हणाल्या, वर्ष 2021 मध्ये सरकारने ‘पावसाचे पाणी – जिथे पडेल तिथे, जेव्हा पडेल तेव्हा साठवा’ अशा आशयाचा संदेश देऊन मोहीम सुरू केली. जल संवर्धन, पावसाच्या पाण्याचा संचय आणि जल व्यवस्थापनाशी संबंधित इतर महत्त्वाचे उद्देश हे या मोहिमेचे ध्येय होते. वन संपत्ती वाढल्यानेही पाणी व्यवस्थापनास मदत होते. जल संवर्धन आणि व्यवस्थापनात लहान मुलांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपापली कुटुंबे आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये ती जागरूकता निर्माण करू शकतात आणि स्वतःही पाण्याचा सुयोग्य वापर करू शकतात. जल शक्ती प्रयत्नांचे जन चळवळीत रुपांतर व्हायला हवे; सर्व नागरिकांनी जल-योद्ध्याची भूमिका बजावयास हवी.
‘भारत जल सप्ताह 2024’चे उद्दीष्ट समावेशी जल विकास आणि व्यवस्थापन आहे. जल शक्ती मंत्रालयाने आपले हे उद्दीष्ट गाठण्यासाठी भागीदारी आणि सहकार्य हे योग्य माध्यम निवडल्याबद्दल त्यांनी मंत्रालयाची प्रशंसा केली.