Connect with us

गोवा खबर

भारतीय तटरक्षक दलाने मंगळुरूच्या किनाऱ्याजवळ सहा मच्छिमारांची केली सुटका

Published

on

Spread the love




गोवा खबर: भारतीय तटरक्षक दलाने 29 जून 2026 रोजी मंगळुरूच्या किनाऱ्याजवळ एका आव्हानात्मक सागरी शोध आणि बचाव (एस ए आर) मोहिमेत संकटात सापडलेल्या मंजू माता या भारतीय मासेमारी बोटीवरील सहा मच्छिमारांची यशस्वीपणे सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सचेत’ जहाजाने दुपारी अंदाजे 4 वाजता सूरतकल किनाऱ्यापासून सुमारे 33 सागरी मैल दूर असलेल्या एका मासेमारी बोटीकडून आलेला VHF RT संकटकालीन संदेश पकडला. समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे बोटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे आणि बोटीच्या तळाचे नुकसान झाल्याचे या संदेशात कळवण्यात आले होते, ज्यामुळे बोटीवरील सहाही खलाशांचा जीव धोक्यात आला होता. कोणताही विलंब न करता प्रतिसाद देत भारतीय तटरक्षक दलाने आपले जहाज वळवले आणि संकटात सापडलेल्या बोटीपाशी जाऊन मदत देऊ केली.
 

खवळलेला समुद्र, सोसाट्याचा वारा, कमी दृश्यमानता यांसारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही आयसीजीएस सचेतच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम उल्लेखनीय कार्यक्षमतेने पार पाडली. अडकलेल्या मच्छिमारांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खराब सागरी परिस्थितीत वापरण्यासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या रिमोट-ऑपरेटेड लाईफबॉय म्हणजेच जीवरक्षक रिंगचा उपयोग केला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व सहा सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरवण्यासाठी आयसीजीएस सचेत सध्या न्यू मंगलोरमध्ये प्रवेश करत आहे.

ही मोहीम म्हणजे समुद्रात मानवी जीवनाचे रक्षण करण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या अढळ वचनबद्धतेचा पुरावा आहे. अत्यंत आव्हानात्मक सागरी आपत्कालीन परिस्थितींवर मात करण्यासाठी तटरक्षक दलाच्या जवानांचे धैर्य, प्रशिक्षण आणि व्यावसायिकता यांचा आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेला प्रभावी समन्वय यातून अधोरेखित होतो.