Connect with us

गोवा खबर

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला कार्यभार

Published

on

Spread the love

गोवा खबर:देशाचे 31 वे लष्कर प्रमुख म्हणून, जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम) यांनी आज मावळते लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी आज म्हणजेच 30 जून 2026 रोजी आपल्या चार दशकांच्या दैदीप्यमान कारकीर्दीनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.

जनरल धीरज सिंह, खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे  माजी विद्यार्थी असून, डिसेंबर 1986 मध्ये त्यांनी सशस्त्र दलात (आर्मर्ड कॉर्प्समध्ये) प्रवेश केला. आपल्या चार दशकांच्या प्रदीर्घ काळात, त्यांना कूटनीती, क्षमता बांधणी आणि संस्थात्मक क्षेत्रातील काम, अशा सगळ्या क्षेत्रांचा अनुभव असून,  त्यांनी भारतीय लष्कराची लढावू क्षमता अधिक प्रभावी करणे आणि त्यात दीर्घकालीन परिवर्तन आणणे, यात महत्वाचे योगदान दिले आहे.

अनेकविध मोहिमांच्या वातावरणात, प्रत्येक पातळीवर नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये, वाळवंटी क्षेत्रातील एका आर्मर्ड रेजिमेंटचे नेतृत्व, पश्चिम आघाडीवरील एका आर्मर्ड ब्रिगेडचे तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी दलाचे नेतृत्व समाविष्ट आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी भारतीय लष्कराच्या अग्रगण्य स्ट्राइक फॉर्मेशन्सपैकी एक असलेल्या सुदर्शन चक्र तुकडीचे नेतृत्व केले.याशिवाय, त्यांनी अनेक महत्त्वाच्या स्टाफ आणि सामरिक पदांवर कार्य केले असून, कार्यकारी नियोजन, दल व्यवस्थापन आणि क्षमता विकास या क्षेत्रांवर त्यांनी लक्षणीय प्रभाव टाकला आहे.

लष्करी दल, आधुनिक करण्यात त्यांचं लक्षणीय योगदान असून लष्कर मुख्यालयातील सामरिक नियोजन आणि क्षमता विकास विभागांतील महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत होते. या भूमिकांमधून त्यांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाची दिशा, क्षमता विकासाचा आराखडा आणि दीर्घकालीन दल संरचना उपक्रम राबवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्धभूमीच्या गरजांशी कार्यकारी आवश्यकता सुसंगत ठेवण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.

एक अत्यंत उत्कृष्ट लष्करी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे जनरल धीरज सेठ यांनी व्यावसायिक लष्करी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ते हायर कमांड कोर्स आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांचे पदवीधर असून, त्यांनी पॅरिस इथे आयोजित केला  जाणारा, प्रतिष्ठित कमांड अँड स्टाफ कोर्स देखील पूर्ण केला आहे. या अनुभवांवरुन, त्यांचा व्यापक सामरिक दृष्टिकोन आणि वर्तमानातील लष्करी घडामोडींचे सखोल आकलन स्पष्ट होते.