गोवा खबर : “काँग्रेसने आपल्या ५० वर्षांच्या कार्यकाळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काहीही केले नाही. उलट, महिला आरक्षण विधेयकासारख्या महत्त्वाच्या निर्णयांना विरोध करून त्यांनी देशातील ७० कोटी महिलांचा अपमान केला आहे,” अशा कडक शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
राज्यात आयोजित ‘नारी शक्ती वंदन’ मेळाव्यात महिलांच्या अलोट गर्दीला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक , महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे: महिला आरक्षण विधेयक: मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ आणून महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३% आरक्षण देण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. मात्र, काँग्रेस, टीएमसी आणि डीएमके सारख्या पक्षांनी याला सातत्याने विरोध केला.
विकासकामांचा पाढा: मोदी सरकारने महिलांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की: स्वच्छ भारत: ११ कोटी महिलांना शौचालये बांधून दिली. उज्ज्वला योजना: घरोघरी गॅस कनेक्शन देऊन महिलांना धुरापासून मुक्ती दिली. आर्थिक स्वावलंबन: ४४ कोटी जनधन खाती उघडली, ज्याचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला. लखपती दिदी: ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘मुद्रा योजने’तून महिलांना उद्योजक बनवले.
गोव्यातील योजना: गोवा सरकारनेही महिलांचा सन्मान राखत दर महिन्याला लाडली लक्ष्मी आणि गृह आधार सारख्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत थेट महिलांच्या खात्यात जमा केली आहे. आगामी काळात ही मदत वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विरोधी पक्षांवर टीका: मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला ‘स्त्री-विरोधी’ पक्ष संबोधले. ते म्हणाले, “ज्या पक्षाने महिला पंतप्रधान असूनही महिला आरक्षणाचा विचार केला नाही, त्यांना आज महिलांच्या हक्कावर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने नेहमीच देशविरोधी आणि महिलाविरोधी भूमिका घेतली आहे.”
शेवटी, “२०२९ च्या निवडणुकीत संसदेत 281 हून अधिक महिला प्रतिनिधी असतील, हे मोदींचे स्वप्न आपण पूर्ण करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि उपस्थितांना भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
‘भारत माता की जय’ आणि ‘नारी शक्तीचा विजय असो’ अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.