गोवा खबर:गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या नवीन वर्षाचे आणि चैत्र शुद्ध एकादशीचे औचित्य साधून सत्तरी तालुक्यातील पर्येयेथील भूमिका मैदानावर ‘अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. विठूनामाच्या गजरात आणि भक्तीच्या रसात संपूर्ण सत्तरी तालुका न्हाऊन निघाला असून, या सोहळ्याला १५ हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावत एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
भक्तीचा महापूर आणि जनसागर
पर्ये येथील भव्य मैदानात सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला केवळ सत्तरीतीलच नव्हे, तर राज्यभरातून लोक उपस्थित होते. हजारो महिला, युवक, वृद्ध आणि लहान मुलांनी या भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला. ‘अभंग रिपोस्ट’च्या चोखंदळ संगीतावर तरुणाईसह आबालवृद्धांनी ठेका धरला. वाद्यांच्या तालावर सर्वजण तल्लीन होऊन नाचताना दिसले, ज्यामुळे परिसरात भक्तीचे आणि तेजाचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.
युवा पिढी संस्कृती पुढे नेणार: आमदार डॉ. दिव्या राणे
यावेळी मार्गदर्शन करताना पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या की, “आजच्या युवा पिढीला संत साहित्य आणि आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख करून देणे काळाची गरज आहे. अशा कार्यक्रमांतून अंधविश्वास दूर होऊन विचारांची प्रगल्भता वाढते. पंढरीच्या वारीत वारकऱ्यांची जी तळमळ असते, त्याची प्रचिती आज या ठिकाणी जमलेल्या अफाट जनसागराकडे पाहून येत आहे. ही तरुण पिढी आपली संस्कृती नक्कीच पुढे नेईल, यात शंका नाही.”
सत्तरीतील युवा पिढी सन्मार्गाकडे जाणार: विश्वजीत राणे
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या भाषणात युवा शक्तीवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जा सकारात्मक ठिकाणी वापरली जावी, यासाठी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माउलींसारख्या संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सत्तरीमधील युवा पिढी आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून सन्मार्गाकडे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
दिग्गजांची उपस्थिती आणि भव्य स्वागत
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे,आमदार डॉ. दिव्या राणे,विजयादेवी राणे (ज्यांचे स्वागत मानाचे पुष्प देऊन करण्यात आले)जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ डबळई, नामदेव चारी,विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. या सोहळ्याने सत्तरीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले आहे.