Connect with us

गोवा खबर

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत उसगाव न्हाले भक्तिरसात; ‘अभंग रिपोस्ट’ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : उसगाव येथील टाकवाडा मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि विशेषतः तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने समई प्रज्वलित करून या सोहळ्याचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, “कोणतेही राजकारण न करता युवकांमधील ऊर्जेला आध्यात्मिक मार्गाकडे वळवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या पिढीचे विचार वेगळे आहेत आणि त्यांना त्यांच्याच भाषेत अध्यात्माची गोडी लावणे आवश्यक आहे. उसगावातील लोकांना संघटित करण्याचा आणि नवी वाटचाल सुरू करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहे.”

आबालवृद्धांनी धरला फेर

संतांच्या अभंगांवरही तरुणाईला नाचवता येते, हे ‘अभंग रिपोस्ट’ या बँडने सिद्ध केले. पारंपरिक अभंगांना पाश्चात्य संगीताचा साज चढवून सादर केलेल्या या गाण्यांनी उसगाववासियांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. या आधुनिक भजनांच्या तालावर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी विठ्ठल नामाच्या गजरात ठेका धरला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही या तालावर फुगड्या खेळण्याचा आणि नाचण्याचा मोह आवरला नाही.

कलाकारांचा गौरव

याप्रसंगी मुख्य गायक प्रतीश म्हस्के, दुष्यंत देवरुखकर (ड्रम), स्वप्निल तरफे (बास गिटार), अजय वव्हाळ (गिटार), तुषार तोतरे (हार्मोनियम), रोशन आडे (तबला), पी.एस. आचार्य, सुमित शिंदे आणि अभिजीत चव्हाण या कलाकारांचा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला भाजप वाळपई मंडळ समितीचे अध्यक्ष रामा खरवत, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक, उसगाव सरपंच राजेंद्र नाईक, उपसरपंच संगीता डोईफोडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू, तसेच पंच सदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, संजय गावडे, नरेंद्र गावकर, विनोद मास्कारेन्हास, विलियम मास्कारेन्हास, रेश्मा मठकर आणि समाजसेवक विनोद शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच राजेंद्र नाईक यांनी केले, स्वागत समीक्षा नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. रामनाथ डांगी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.