गोवा खबर : देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे म्हणूनच मुलींच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सरकारच्या उपक्रमांचे मुलींच्या उन्नतीसाठी खूप महत्त्व आहे असे, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. महिला आणि बाल विकास खात्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची १० वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजभवन दोना पावला येथे ते बोलत होते.
पिल्लई यांनी देश आर्थिक विकासाकडे वाटचाल करीत आहे तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना देशभरात चांगली कामगिरी करीत आहे असे सांगितले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी प्रयत्नांचे आणि पुढाकारांचे त्यांनी कौतुक केले. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
महिला आणि बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी समाजात मुलींबद्दल असलेली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज यावर भर दिला. मुली समान आहेत आणि त्यांना समाजात सन्माननीय स्थान दिले पाहिजे हे सत्य लोकांनी स्वीकारले पाहिजे असे ते म्हणाले. महिलांचा आर्थिक, सामाजिक दर्जा उंचाविण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करीत आहे असेही ते म्हणाले.

देशात मुलींचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना सुरू केल्याबद्दल श्री. राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. या योजनेसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकार गंभीर प्रयत्न करीत आहे, ज्यामध्ये महिलांना त्यांच्या स्वप्नातील कारकिर्द साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त पाठिंबा दिला जाईल, असे ते म्हणाले.
“बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेचे उद्दिष्ट लिंगभेद लिंग-निवड निर्मूलन रोखणे, जन्माच्या वेळी मुलींचे लिंग प्रमाण सुधारणे, उच्च माध्यमिक शिक्षणात मुलींची नोंदणी वाढविणे इत्यादी आहे.
महिला आणि बालविकास सचिव अरुण कुमार मिश्रा आयएएस यांनी “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पोषण स्थिती सुधारण्यासाठी सरकार आरोग्य उपचारांचा विस्तार करीत आहे. अशक्त महिलांसाठी उपचार देण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ गर्भवती न राहणाऱ्या आणि बाळंतपणाची आकांक्षा असलेल्या विवाहित महिलांसाठी वैद्यकीय उपचार देण्याचा सरकारचा मानस आहे.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, आयएएस यांनी आपल्या भाषणात मुलींना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कुटुंबाने पाठिंबा देण्याचे महत्त्व प्रतिपादले. सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी महिलांनी एकमेकांना खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे, तरच समाजात इच्छित बदल दिसून येईल असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी महिला आणि बाल विकास खात्याच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या काही मुलींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडविणारा फॅशन शो आणि नृत्य सादर करण्यात आले. यावेळी महिला आणि बालविकास संचालक मॅन्युएल बार्रेटो, उपसंचालक ज्योती देसाई आणि इतर उपस्थित होते.