गोवा खबर : नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.
यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
आपण यापूर्वीही माध्यम जगताने आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, परंतु NewsX World ने आज एक नवी परंपराच आखून दिली असल्याची बाबही पंतप्रधानांनी नमूद केली. त्यांनी या यशासाठी NewsX Worldचे विशेष अभिनंदनही केले. आपल्या देशात अशा प्रकारच्या माध्यम कार्यक्रमांची एक परंपरा आहे, परंतु NewsX World ने त्याला एक नवा आयाम मिळवून दिला असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या समुहाने आयोजित केलेल्या ही शिखर परिषद धोरण-केंद्रित आहे, यात राजकारणाऐवजी धोरणांना केंद्रस्थानी ठेवले असले असल्याचे त्यांनी सांगितले.

आज भारत विविध क्षेत्रांचे करत असलेले नेतृत्व हे अनेक वर्षांच्या कष्ट आणि पद्धतशीर धोरणात्मक निर्णयांचे फलित आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षांत भारताने केलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला. आता अर्धवट पूल आणि रखडलेल्या रस्त्यांच्या जागी आता चांगले रस्ते आणि उत्कृष्ट दृतगती मार्ग बांधले गेले आहेत, यामुळे नवीन गतीने पुढे जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ते म्हणाले.
आज देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्येही असेच परिवर्तन दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत, 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत पहिल्यांदाच वीजेची सुविधा पोहोचली, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी आणि उत्पादन वाढले ही बाब त्यांनी अधोरेखित केली. देशात डेटा स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्यामुळे मोबाईल फोन्सची मागणी वाढली आहे आणि मोबाईल फोन्सवरील सेवांच्या उपलब्धतेमुळे डिजिटल उपकरणांचा वापरही वाढला आहे असे त्यांनी सांगितले.
आगामी 25 वर्षांत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पासह आजचा भारत वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ITV समुहाने ही असाच संकल्प करून जागतिक मंचावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले, आणि यात ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला ITV मीडिया नेटवर्कचे संस्थापक आणि राज्यसभेचे खासदार कार्तिकेय शर्मा, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबट, श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.