500 रोजगार निर्माण करणार : मंत्री राणे यांची माहिती
गोवा खबर : बोंडला अभयारण्याला नवा साज देण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी इको टुरिझम चांगल्या प्रमाणात फुलावे म्हणून सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. आगामी काळात या अभयारण्याच्या माध्यमातून किमान 500 रोजगार येथे निर्माण करू, असे आश्वासन वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिले.
अभयारण्यात नूतनीकरण केलेल्या कॉटेजीस व इतर साधन सुविधांचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार व वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे, मुख्य वनपाल कमल दत्ता, वन अधिकारी प्रवीण कुमार राघव, जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच रामनाथ डांगी आदी उपस्थित होते.
मंत्री म्हणाले, रोजगार निर्मितीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. रोजगाराआधी युवकांना अभयारण्य पर्यावरणासंदर्भात शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल. बोंडला अभयारण्यात आणखी प्राण्यांचा समावेश करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी इतर राज्यांशी समन्वय साधला जात आहे. प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कुशल वैद्यकीय टीम निर्माण केली जाणार आहे.
बोंडला अभयारण्यात समांतर असे इको टुरिझम विकसित करण्यावर आमचा भर आहे. पर्यटक येथे किमान दोन दिवस राहायला येतील, असे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. येथे आणखी खोल्या वाढवण्यात येतील. अभयारण्याला पूरक मनुष्यबळ इथेच तयार करू, असे राणे यांनी सांगितले.
इको टुरिझम व हिंटरलॅण्ड टुरिझमसंदर्भात आम्ही नुसत्या घोषणा करून थांबणार नाही. तर त्यासाठी पर्यावरण तयार करणार आहोत. दुर्गम गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. व्हिलेज टुरिझम संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इको टुरिझमसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पावले उचलली आहेत, असे मंत्री म्हणाले.
आमदार दिव्या राणे म्हणाल्या, गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे ही ओळख पुसून काढताना पर्यटकांना जंगलांची सैर घडवणार आहोत. वनमंत्री विश्वजित राणे यांनी वनविकास महामंडळाला पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इको टुरिझम प्रणाली राज्यभर राबवू, इथल्या नैसर्गिक सुविधांचा वापर करून पर्यटनाला वेगळा आयाम दिला जाईल. दूधसागर व इतर नैसर्गिक पर्यटन स्थळात वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत.
जंगल पर्यटनाच्या माध्यमातून येथे आर्थिक सुबत्ता कशी येईल याचे नियोजन सुरू आहे. गोव्यातील ग्रामीण भागातील खाद्य संस्कृतीची ओळख इथल्या पर्यटकांना करून देणार, असे मुख्य वनपाल कमल दत्ता म्हणाले.
वनविकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नंदकुमार परब यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक अमर हेबळेकर यांनी आभार मानले.