गोवा खबर : गोव्यातील बहुप्रतीक्षित असा अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव २०२५ आज गोव्याच्या समृद्ध वारसा, वैविध्यपूर्ण सांस्कृती आणि अतुलनीय पाककला खजिन्याच्या नेत्रदीपक उत्सवाने संपन्न झाला. पर्यटन खात्यातर्फे मडगाव येथे कोस्ता/डुकले प्रॉपर्टीजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय भव्य महोत्सवात, स्थानिक आणि अभ्यागतांना गोव्याच्या अनोख्या आकर्षणाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली.
या महोत्सवाचा ग्रँड फिनाले हा गोव्याच्या सांस्कृतिक जीवंतपणाचा एक भव्य सोहळा होता. या शेवटच्या दिवसाची सुरुवात ‘गोवन इमेज’ डान्स ट्रूपच्या मनमोहक नृत्याने झाली, त्यानंतर राजेश मडगावकर आणि गौतमी हेदे यांनी त्यांच्या सह गायकांसोबत आकर्षक गायन सादर केले. संध्याकाळनंतर ‘गोवा इमेज’ डान्स ट्रूपने आणखी एक उत्साहपूर्ण असे नृत्य सादर केले. निशी सिंग आणि तिच्या संगीतकारांनी संगीत प्रेमींना एक भावपूर्ण सत्राची मेजवानी दिली, तर मनोहर भिंगी यांच्या मिमिक्री सादरीकरणाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. ‘पर्पल रेन’ या लोकप्रिय बँडच्या पॉवर-पॅक ग्रँड फिनाले सादरीकरणाने प्रेक्षकांना थक्क करून सोडले व महोत्सवाचा समारोप झाला.

महोत्सवाच्या यशाबद्दल विचार व्यक्त करताना माननीय पर्यटन मंत्री, रोहन खंवटे म्हणाले, कि “अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर गोव्याचा आत्मा जगासोबत साजरा करून तो सामायिक करण्याचे एक व्यासपीठ होते. हा महोत्सव आपल्या समृद्ध परंपरेचे प्रदर्शन करून गोमंतकीय संस्कृती आणि पाककृतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आमच्या वैविध्यपूर्ण अशा पाककृती वारशापासून ते स्थानिक कलाकारांच्या दोलायमान कामगिरीपर्यंत, या कार्यक्रमाच्या प्रत्येक पैलूने गोव्याची अनोखी अशी ओळख प्रतिबिंबित केली आहे. आम्हाला आशा आहे, की अशा महोत्सवांमुळे गोव्याचे सार अनुभवण्यासाठी अधिक लोकांना प्रेरणा मिळेल. तसेच संस्कृती, कला आणि पुनरुत्पादक पर्यटनासाठी जागतिक गंतव्यस्थान म्हणून गोव्याची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल.”
पर्यटन खात्याचे संचालक, सुनील अंचिपाका, आयएएस, म्हणाले, कि “अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव २०२५ या तीन दिवसीय कार्यक्रमाने गोव्याच्या समृद्ध अश्या सांस्कृतिक आणि पाककलेचा वारसा यशस्वीपणे प्रदर्शित केला. याने स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही गुंतवून ठेवले आणि त्यांना गोव्यातील दोलायमान चव व परंपरा साजरी करण्याची संस्मरणीय संधी दिली. आमचा वारसा साजरे करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे.”

महोत्सवाने ३ आणि ४ जानेवारी रोजी, पाककृती वारसा आणि कलात्मक विविधता यांचे दोलायमान मिश्रण प्रदर्शित केले. महोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशी गोव्याच्या परंपरेचे अनोखे मिश्रण अधोरेखित करणाऱ्या, मनमोहक सांस्कृतिक सादरीकरणाने पूरक असलेल्या, गोव्यातील पारंपारिक खाद्यपदार्थांच्या आल्हाददायक रांगेसह महोत्सवात एक वेगळाच स्तर स्थापित केला. दुसऱ्या दिवशीही उत्साह कायम राहिला, ज्यात उदयोन्मुख प्रतिभा आणि कलात्मक चैतन्य साजरे करण्यात आले. अभ्यागतांना गायकांचे मधुर सादरीकरण आणि ‘गोवा इमेज’ डान्स ट्रूपची दमदार नृत्ये पहायला मिळाली. समृद्ध चोडणकर आणि विभा आल्गुंडगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तर कॉमेडियन साईदत्त कामत यांनी त्याला विनोदाचा डोस जोडला. त्या दिवशी ‘लेस’ बँडने एक तजेलदार सादरीकरण केले, ज्यामुळे प्रेक्षक उत्साही झाले आणि ग्रँड फिनालेसाठी उत्सुक देखील झाले. दुस-या आणि तिसऱ्या दिवशी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी महोत्सवात उपस्थित राहून या सोहळ्याची भव्यता वाढवली आणि या महोत्सवाला विशेष महत्त्व दिले.
दमदार सादरीकरणा व्यतिरिक्त, हा महोत्सव म्हणजे खाद्यप्रेमींसाठी एक स्वर्ग होता, ज्यामध्ये गोव्याचे पारंपारिक स्वादिष्ट पदार्थ होते. गोव्याच्या समृद्ध वारसा आणि सर्जनशील भावनेशी सखोल संबंध प्रदान करून, अभ्यागतांना कलात्मक प्रदर्शनांमध्ये अस्सल अनुभव देण्यात आला.
यंदाच्या महोत्सवाचा समारोप झाला असताना, पर्यटन खाते गोव्याच्या दोलायमान संस्कृतीला आणि शाश्वत पर्यटन पद्धतींना चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे. गोवा अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव २०२५ ने नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचा स्वीकार करताना, राज्याच्या परंपरेचे प्रदर्शन करण्याच्या आशादायक भविष्यासाठी एक मंच तयार केला आहे.