गोवा खबर: दोन वर्षांआधी गोव्यातील दिव्यांगांसाठी जी पोलिस मानक कार्यप्रणाली (एसओपी) व हेल्पलाईन सुरू केली होती, ती बंद पडल्याने विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी खंत व्यक्ती केली आहे आणि ती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
सरकारने तातडीने ‘दिव्यांग सुरक्षा एसओपी’ लागू करावी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक पुन्हा सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बुधवारी केली.
काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिव्यांगांसाठी 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे सातत्य राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
‘आपल्या राज्यात सुमारे पन्नास हजार दिव्यांग आहेत. त्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पुढाकाराने तत्कालीन पोलिस महाअधिक्षक आय. डी. शुक्ल यांनी ही हेल्पलाइन सुरू केली होती. पण ते निवृत्त झाल्यानंतर ही हेल्पलाइन बंद पडली. ती तातडीने सुरू करावी,’ असे आलेमाव म्हणाले.
आलेमाव यांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये गोवा पोलिसांनी 1090 हा कॉमन लँडलाईन नंबर दिला होता आणि बोलू-ऐकू न शकणाऱ्यांसाठी 7875756000 व्हॉट्सॲप नंबर सुरू केला होता. ज्यांना फोनवर पोलिसांशी बोलण्याचा आत्मविश्वास नाही त्यांच्यासाठी ही सेवा सुरू केली होती. या सेवेसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते, मात्र ते प्रत्यक्षात आलेले नाही.
आलेमांव म्हणाले की पोलिस मानक कार्यप्रणालीत अशा खूप सुविधा आहेत, ज्या दिव्यांगासाठी दिल्या पाहिजे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
‘‘काही लोक दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. परंतु त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देण्यास अपयशी ठरले आहे. यावरून हे सरकार दिव्यांगांप्रती असंवेदनशील असल्याचे सिद्ध होते,’’ असे आलेमांव म्हणाले.
पोलिस मानक कार्यप्रणालीनुसार पोलिसांनी आठवड्यातून एकदा दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना काही अडचणी येत असतील तर त्याची नोंद घ्यावी लागते. पण ही प्रथा सध्या थांबलेली दिसते. दिव्यांग आलेल्या नवीन व्यक्तीची नोंदणी करणेही बंधनकारक आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.
सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास पुढील विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करू, असे आलेमाव यांनी सांगितले.