Connect with us

गोवा खबर

 विजय सरदेसाई यांचा केंद्रीय मंत्री सोनोवाल यांना प्रश्र्‍न

Published

on

Spread the love
गोवा खबर : गाेवा हे क्रूझ पर्यटनाचे जागतिक केंद्र बनेल, असे विधान केंद्रीय जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल केले होते. मंत्र्‍यांचे हे विधान चांगले वाटत असले तरी त्‍यांनी मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीबद्धल जे वक्‍तव्‍य केले आहे ते चिंताजनक आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले आहे.
यासंदर्भात आज बोलताना सरदेसाई यांनी मुरगाव बंदर प्राधिकरणातील वाढती कोळसा हाताळणी आणि त्‍यामुळे होणारे प्रदुषण हा २०१७ पासूनचा चिंतेचा मुद्दा आहे. या काळात गोव्याने जहाज बांधणी खात्‍याचे तीन वेगवेगळे केंद्रीय मंत्री पाहिले आहेत, तरीही कोणीही कोळसा हाताळणी कमी करण्यासाठी कोणीही गंभीर वचनबद्धता दाखवलेली नाही. याउलट २०२२ मध्ये, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जिंदाल उद्योग समूहाच्‍या जेएसडब्‍ल्‍यू कंपनीला १५ हजार मेट्रीक टन पर्यंत कोळसा हाताळणी वाढविण्‍याची मंजुरी दिली अाहे. आणि जहाजे बंदरात आणण्‍यासाठी चॅनेलची खोली वाढविण्‍यासाठीही परवानगी दिली याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.
काल बोलताना, विद्यमान केंद्रीय मंत्र्‍यांनी, जेएसडब्‍ल्‍यू कंपनी १८० कोटी रुपये खर्चून घुमट बांधत आहे आणि ते पूर्ण झाल्‍यावर प्रदुषणाचा प्रश्र्‍न सुटणार असे म्‍हटले आहे. ही घोषणा केल्‍यानंतर गोवेकरांचा कोळसा हाताळणीला होणारा विरोध मावळेल असे वाटत असेल. यापूर्वी कोळसा हाताळणीचा मुद्दा करुन मुरगाव मतदारसंघातून जिंकून आल्‍यानंतर भाजपात प्रवेश केलेल्‍या आमदाराने जशी भूमिका बदलली तशीच लोकही भूमिका बदलतील असे वाटत असेल तर ते मुर्खाचे नंदनवनात वावरत असावे असे म्‍हणावेसे वाटते. गोवेकर कोळसा प्रदुषणावरील आपली भूमिका कधीही बदलणार नाहीत असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.
मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीची क्षमता कमी करण्याचा जेएसडब्‍ल्‍यू, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही. आज, कोळसा हाताळणी क्षमता कमी होऊ नये म्हणून घुमटाचा वापर केला जात आहे. घुमट पूर्ण झाल्यानंतर, बंदरातील कोळसा हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी त्याचा उपयोग उपयोग केला जाईल असा संशय व्‍यक्‍त करुन
फक्त घुमट बांधणे हे ५ एमटीपीए किंवा १५ एमटीपीए क्षमतेने कोळसा हाताळणी कार्य सुरू ठेवण्यासाठी कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. कारण राज्यातून जाणारी रेल्वे आणि ट्रकद्वारेही कोळशाच्या वाहतुकीदरम्यान कोळशाचे प्रदूषण होते याचा विसर मंत्र्‍यांना पडला आहे की काय असा सवाल सरदेसाई यांनी केला.
यापूर्वी, माजी जहाजबांधणी मंत्री मनसुख मांडविया यांनी एमपीएमध्ये कोळसा हाताळणी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. कोळसा हाताळणीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी घुमटाचे बांधकाम पूर्ण हाेईपर्यंत या बंदरातील कोळसा हाताळणी बंद राहील अशी गोवेकरांची अपेक्षा होती. पण मंत्र्‍यांच्‍या आश्र्‍वासनाची पर्वा न करता कोळसा हाताळणीचा विस्‍तार करण्‍यात आला याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
धोरणात्मक आघाडीवर, कोळसा हाताळणी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ हब एकाच बंदरात एकत्र अस्तित्वात कुठेही नाहीत हे केंद्र आणि राज्य सरकारने समजून घेणे महत्त्वाचे आहे. जगभरातील, पर्यटन स्थळांना समर्पित क्रूझ बंदरे आहेत आणि त्‍यापासून कार्गो हाताळणी बऱ्याच दूर अंतरावर ठेवल्या जातात. गोवावासियांनी २०१६ पासून क्रूझ ऑपरेशन्स वाढवण्याची मागणी केली होती, त्यामुळे गोव्याला क्रूझ पर्यटनासाठी जागतिक केंद्र बनवण्याचा मंत्र्यांचा प्रस्ताव काही नवीन नाही. वेगवेगळ्या मंत्र्यांची तीच पोकळ आश्वासने ऐकून गोवावासीय थकले आहेत. गोव्‍यात जर क्रूझ पर्यटन वाढवायचे असेल तर या बंदरावरील कोळसा हाताळणी बंद हाेण्‍याची गरज आहे असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे. जानेवारी २०२५ मध्ये मुरगाव बंदरात नवीन क्रूझ टर्मिनल सुरू होण्यापूर्वी अशी योजना तयार करावी किंवा त्याच्या विसंगत कोल हब आणि क्रूझ हब धोरणाच्‍या तीव्र तपासणीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.