गोवा खबर : भुतानी इन्फ्रा या वादग्रस्त कंपनीने प्रायोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भुतानीच्या साकवाळ येथील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार देणे ही दुर्दैवी बाब होती. या वादग्रस्त प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याचे आश्र्वासन मुख्यमंत्र्यांनीच विधानसभा अधिवेशनात दिले होते. याचा त्यांना विसर पडू नये अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
सरदेसाई म्हणाले, साकवाळ येथे भुतानी कंपनीचा जो प्रकल्प येतो त्यासाठी माेठ्या प्रमाणावर डोंगर कापणी केली जाणार आहे. डोंगर कापणीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी दिसून आलेल्या आहेत. त्याशिवाय या प्रकल्पातील आणखीही काही बेकायदेशीर बाबी पुढे आल्या आहेत. या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी आश्र्वासन दिल्याप्रमाणे सखोल चौकशी करण्याची गरज अाहे.
सध्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय दिल्लीहून गोव्यात आलेल्या भूमाफियांना सर्व परवानग्या देणारे एक खिडकी केंद्र असल्यासारखे वावरत आहे अशी लोकांना शंका येते. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी कडक धोरण आखून लोकांमध्ये जी त्यांच्या कार्यालयाची प्रतिमा आहे ती दूर करावी. सरकारने गोव्यातील लोकांचे भले कसे होणार त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भूमाफियांचे दलाल अशी भूमिका सरकारने बजावू नये असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.