Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नगर विकास खाते आणि गोवा राज्य नगर विकास संस्थेने, पंचायत खाते, ग्रामीण विकास खाते आणि पणजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ चा शुभारंभ केला. पणजी येथील कला आणि संस्कृती सभागृहात हा कार्यक्रम झाला. 

२०२४ स्वच्छता ही सेवा मोहीम, “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता,” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत चालेल. या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण गोव्यात स्वच्छता आणि पर्यावरणीय जबाबदारीची संस्कृती वाढविणे हा आहे.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात स्वच्छ पर्यावरण राखून निसर्गाचे रक्षण करून जुन्या व दुर्मिळ वृक्ष प्रजातींचे संरक्षण करण्याचे महत्त्व प्रतिपादले. प्रत्येक गोमंतकीयांनी आपला परिसर कचऱ्यापासून मुक्त ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. सावंत यांनी सर्व १२ तालुक्यांना पुढील १५ दिवसांत “स्वच्छ आणि नीट तालुका” चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारी स्पर्धा जाहीर केली, ज्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात येईल.

याव्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांनी सरकारने कार्यालयांच्या प्रमुखांना त्यांच्या कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी  रूपये ५ लाखांपर्यंत वाटप करण्याची परवानगी दिली आहे असे सांगितले. प्रभावी कचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाची बांधिलकी त्यांनी  प्रतिपादली. घनकचरा व्यवस्थापन प्लांट्स, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट्स, ई-वेस्ट प्लांट्स आणि कन्स्ट्रक्शन वेस्ट प्लांट्स यासह प्रगत कचरा व्यवस्थापन सुविधांच्या स्थापनेसाठी गोव्याच्या अग्रगण्य प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. स्वच्छता हे समाजासाठी महत्त्वाचे वैयक्तिक योगदान आहे असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी पंचायत मंत्री माविन गूदिन्हो यांनी कचरा कर वसुली सुनिश्चित करण्यासाठी पंचायतींच्या गरजेवर भर दिला आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १०० पंचायतींना वाटप केलेल्या निधीवर प्रकाश टाकला. त्यांनी तरुणांना स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि वैयक्तिक जबाबदारी वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाला नगरविकास खात्याचे सचिव डॉ. संजय गोयल, आयएएस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, श्री गोपाळ पार्सेकर, ग्रामीण विकास संचालनालयाचे संचालक  गोपाळ पार्सेकर,  नगर विकास संचालनालयाचे संचालक ब्रिजेश मणेरकर, पंचायत संचालनालयाच्या संचालिका सिद्धी हळर्णकर आणि इतर उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.