गोवा खबर : बनावट अॅपच्या माध्यमातून गुंतवूणक करण्यास भाग पडून फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन गुंतवणूक करताना सावध रहा, असे आवाहन सायबर गुन्हे कक्षाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले आहे.
व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलीग्राम आदी विविध सोशल मीडियावरून लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाईन जाहिरात पाठवली जाते. अनेकजण या जाहिरातींना बळी पडतात. सुरुवातीला गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात त्यांना मोठा नफा दिला जातो. मात्र कालांतराने नफा देणे बंद होते. अशा बनावट अॅपव्दारे लोकांनी आतापर्यंत लाखो रुपये गमावले आहेत. यामुळे सावध रहावे, असेही त्यांनी नमूद केले.
अशी होते फसवणूक
लोकांना व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलीग्राम आदी विविध सोशल मीडिया व्यासपीठांवरून शेअर, म्युचअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी जाहीरात पाठवली जाते. या जाहिरातींबाबत विचारणा झाल्यानंतर ऑनलाईन लिंक पाठवली जाते. या लिंकच्या सहाय्याने शेअर, म्युचअल फंडमध्ये ठरावीक रक्कम दर महिन्याला लोक गुंतवतात. सुरुवातीला त्याबदल्यात मोठा नफाही दिला जातो. मात्र त्यानंतर त्यांची फसवणूक केली जाते.
ऑनलाईन पैसे गुंतवताना अगोदर त्या शेअर मार्केट, म्युचअल फंड तसेच आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.