Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, आपल्या समाजातील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम आणि समर्पितपणे दिलेल्या योगदानाला आदरांजली म्हणून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एक महान शिक्षक, प्रख्यात तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ञ आणि प्रगल्भ मानवतावादी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ५ सप्टेंबर रोजी जयंती आहे. आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि प्रथम उपराष्ट्रपती म्हणून सेवा केलेले ते एक मोठे राजकारणीही होते.

शिक्षक बांधवांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातून आणि कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडविण्यासाठी विधायक भूमिका बजावावी. ज्ञान आणि सलोख्याचा समाज निर्माण करण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या समर्पित सेवेबद्दल अभिवादन आणि शुभेच्छा, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

 मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक समाजाला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आणि मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कार २०२३-२४  प्राप्त करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ५ सप्टेंबर हा  दिवस आपले माजी राष्ट्रपती स्व. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. ते एक महान शिक्षक, शिक्षणतज्ञ आणि तत्त्वज्ञानी होते आणि दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशातील शिक्षक समुदायाचे मनोबल आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले.

प्राचिन काळापासून, तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे, त्यांना ज्ञानाचा प्रकाश देणारे आणि त्यांच्या मनाला प्रज्वलित करणारे आदर्श शिक्षक मानतात. एक आदर्श शिक्षक म्हणून सर्व शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांची योग्य जडणघडण करण्यास योगदान दिले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणतात.

 शिक्षक दिन साजरा करताना आम्ही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरपूर्वक आदरांजली वाहतो आणि आपल्या राष्ट्राचे निर्माते म्हणून शिक्षकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्मरण करतो.

 शिक्षक दिनाच्या प्रसंगी मी गोव्यातील शिक्षक वर्गाला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून आणि समर्पण आणि बांधिलकीच्या भावनेने आपले कर्तव्य पार पाडावे. मी पुन्हा एकदा गोवा राज्यातील सर्व शिक्षकांना माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.