गोवा खबर : समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केपेचे आमदार अल्टोन डिकोस्टा यांच्या उपस्थितीत अटल ग्राम विकास संस्था आणि नवी दिशा क्लस्टर फाऊंडेशनतर्फे आयोजित वार्षिक माटोळी बाजाराचे केपे येथे उद्घाटन केले.
हा बाजार गणेश चतुर्थीच्या आधी आयोजित केला जातो ज्यामध्ये ११ ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका, केपे तालुक्यातील स्वंय बचत गट आणि व्यक्तींना सामावून घेतले जाते.
यावेळी बोलताना फळदेसाई यांनी आपल्या महिलांमध्ये क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता, प्रतिभा, सर्जनशीलता आहे आणि जोपर्यंत त्या स्वत: पुढे येत नाहीत तोपर्यंत हे गुण दिसत नाहीत असे सांगितले.
महिलांसाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण, कौशल्य, अप स्किलिंग आणि रिस्किलिंग आवश्यक आहे आणि त्यासाठी माटोळी बाजार हे एक माध्यम आहे. सांगे येथे नजीकच्या काळात बांधल्या जाणाऱ्या कुणबी ग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील कला आणि कौशल्याला स्थान दिले जाईल. सरकार विविध माध्यमातून सवलती आणि योजना देत राहील. गोवा सरकार ग्रामोदय, सर्वोदय आणि अंत्योदय या तत्त्वावर काम करतो, ज्यामुळे आत्मनिर्भर भारत आणि स्वंयपूर्ण गोवा बनविण्याचा निर्धार यशस्वी करण्यास मदत होईल असे फळदेसाई यांनी सांगितले.
आमदार डिकोस्टा यांनी महिलांना प्रेरित करण्यासाठी माटोळी बाजार सारखी संकल्पना खरोखरच एक चांगले व्यासपीठ आहे असे सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा संजना वेळीप, अटल ग्रामचे अध्यक्ष शशिकांत गावकर यांची यावेळी भाषणे झाली.
अटल ग्राम एजन्सीचे संचालक, सुहास देयकर, गटविकास अधिकारी अनिल नाईक, विभागीय कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई व इतर यावेळी उपस्थित होते.