गोवा खबर : दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्यावतीने चालू सप्टेंबर महिन्यात नदीच्या विसर्जनाचा अभ्यास करण्यात येणार आहे. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी मांडवी नदीत पणजी येथे, ५ आणि ९ सप्टेंबर रोजी जुवारी नदीत बोरी येथे बोरी पूलाच्या खालच्या भागात ५ आणि ९ सप्टेंबर रोजी चोपडे नदीत कोलवाळ येथे कोळवाळ-धारगळ पुलाच्या वरच्या भागात आणि १६ आणि २३ सप्टेंबर रोजी तेरेखोल नदीत केरी येथे नदीच्या पाण्याचा अभ्यास करण्यात येईल.

त्यासाठी वरील नदीतून वाहतूक करणाऱ्या सर्व बार्जेंस, प्रवासी लाँची, क्रुईज बोटी, जलक्रिडा बोटी, लहान होडी, फेरीबोटी, मच्छिमारी बोटी आणि इतर यांत्रिकीं आणि बिनयांत्रिकी नाविकांनी वरील दिवसांनी खबरदारी घेवून सावकाश वाहतूक करावी. तसेच गस्त बोटीकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे, असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.