Connect with us

गोवा खबर

आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गोमेकॉतील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोलकाता येथे 31 वर्षीय डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सना सुरक्षा मिळावी यासाठी गोमेकॉच्या निवासी डॉक्टर्सनी केलेले धरणे आंदोलन मागे घेतले. डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करून त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉक्टर्सच्या शिष्टमंडळाला दिले.

आरोग्यमंत्री राणे यांनी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. राणे यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी धरणे मागे घेतले. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

गोमेकॉतील डॉक्टर्सच्या सुरक्षेबाबत उपाय योजावेत, सीसीटीव्ही लावावेत, डॉक्टरांना रात्रीच्या वेळी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी, कामाचे वातावरण सुरक्षित असावे आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या होत्या. त्यावर डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.