गोवा खबर : स्वांतत्र्यसैनिक तथा पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांचे लेखन व कार्याची माहिती नव्या पिढीकडे पॉडकास्टच्या माध्यमातून पोचविण्याची गरज पर्यटनमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.
बोरकर यांच्या शतक महोत्सवी जयंती समारोहनिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात यावयाच्या कार्यक्रमाचे येथील सेंट्रल लायब्ररीत समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर खंवटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गुरूदास सावळ, बोरकरांची पत्रकारीता व जीवन यावर बीजभाषण करणारे संपादक परेश प्रभू, ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू, लायब्ररीचे क्युरेटर डॉ. सुशांत तांडेल, बोरकरांचे सुपूत्र डॉ. नितीन बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बोरकरांनी गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून खंवटे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची आणि त्यागाची ओळख नव्या पिढीला राष्ट्रीय दिनीच नव्हे तर सदोदीत करून द्यायला हवी. त्यासाठी बोरकर जयंती समारोहा सारखे कार्यक्रम आयोजित होणे ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रप्रेम आजच्या पिढीमध्ये निर्माण करताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग काय होता याचीही जाणीव व्हायला हवी. बोरकर जयंती समारोहाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचे कार्य व लेखन आत्ताच्या विद्यार्थ्यांपुढे नेण्यासाठी शाळाशाळांमध्ये कार्यक्रम व्हावेत असे आवाहन खंवटे यांनी केले.
आग्वाद येथे पर्यटन खात्याने किल्ल्याचे केलेले नूतनीकरण जर विद्यार्थ्यांना दाखवायचे असल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू असे खंवटे म्हणाले. बोरकरांचे कार्य पुढे नेण्यासाठी काहीही गरज असल्यास सांगा, त्यासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन खंवटे यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
माजी वीज मंत्री निर्मला सावंत, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, कोकणी लेखक दिलीप बोरकर, वरिष्ठ पत्रकार, विद्यार्थी व लक्ष्मीदास बोरकरांचे कुटंबिय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बोरकरांच्या नातवंडानी व्यासपीठावरील मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले. बोरकर यांच्या अग्रलेखांचे भरवलेल्या प्रदर्शनीचीही खंवटे यांनी पाहाणी करून कौतुक केले.