Connect with us

गोवा खबर

खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे विक्री तथा प्रदर्शनाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. आंतोनियो वाज यांनी पाटो पणजी येथील संस्कृती भवनात केंद्रिय वाचनालयात आयोजित केलेल्या खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आणि विक्रीचे उद्घाटन केले.

गोवा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून विविध खादी आणि उद्योग उत्पादनांचे प्रदर्शन भरविले आहे.

श्री. आंतोनियो वाज यांनी यावेळी बोलताना गोवा खादी आणि ग्राम मंडळाने स्थानिक कारागीर आणि उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या विविध सुविधा आणि अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी त्यामुळे ग्रामीण कारागीर व उद्योजकांना फायदा होईल असे आवाहन त्यांनी केले.

श्री. वाज यांनी खादी आणि ग्रामोद्योग ग्रामीण भागातील लोकांना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यातून तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविता येते. असे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या नवनवीन कल्पनांसह युवकांनी ग्रामोद्योगात उतरण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

       गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सर्वानंद भगत यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी खादी उद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. लोकांनी शक्यतो खादी उत्पादनांचा वापर करावा ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे ते म्हणाले.

प्रदर्शनात खादी उत्पादनांवर २०% सवलत आहे आणि ते १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत चालणार आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेनान्सियो फुर्तादो यांनी स्वागत केले.

गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सदस्य श्री. रॉकझिनो डिसोझा, श्री. शशिकांत परब, श्री. विलास देसाई, जिल्हा पंचायत सदस्या श्रीमती. मर्सियाना वाज, केव्हीआयसीचे संचालक श्री. विजेंद्र सिंग, केंद्रिय वाचनालयाच्या क्युरेटर श्रीमती. सुलक्षा कोळमुळे यावेळी उपस्थित होत्या.

श्रीमती. प्रिता परब यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती. सुषमा नाईक यांनी आभार मानले.