गोवा खबर : सत्तरीत वीजेची समस्या जटिल बनली आहे. पावसाळ्यात वीजेची समस्या गंभीर असते. एकदा वीज गेली की आठवडाभर वीज येथे येत नाही. यातून पिण्याच्या पाण्यावरदेखील परीणाम होतो. त्यामुळे वीज खात्यातील अधिकाऱ्यांना केवळ कार्यालयात बसून न ठेवता कामाला लावणे गरजेचे आहे, असे मत पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत व्यक्त केले.
वीज व पाणी या मुलभूत गरजा आहे. शहरात राहून आम्हाला गावातील समस्या कधीच लक्षात येणार नाही. वीजच गायब असल्याने पाणी शुध्दीकरण प्रकल्प चालत नाही आणि पिण्याचे पाणी घरोघरी पोहचत नाही. यातून लोकांचे मात्र खूप हाल होतात, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.
लोक त्रस्त झाले आहेत. अनेकदा यातून भांडणे देखील होतात. यात त्यांची चूक नाही, त्यांना योग्य व मुलभूत सुविधा पुरवणे आमचे काम आहे, असे राणे यांनी सांगितले. सत्तरीत अनेक ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम अजूनही रखडले आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर वीजमंत्र्यानी भर दिला पाहिजे. इतर काही उपाययोजना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी करता येईल का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. तसेच ज्युनियर अभियंत्यांना कामाला लावणे आवश्यक आहेसच, पण त्यांच्याकडून काम करुन घेण्याची जबाबदारी सिनियर अभियंत्यांची आहे. वीज गेल्यानंतर त्यांनी देखील यात लक्ष घालून ही समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले.
पर्ये येथील शेतकऱ्यांसह गावांना फायदेशीर ठरणारे जलस्त्रोत खात्यांतर्गतचे सुमारे दहा कोटी रुपयांचे २५ प्रकल्पांचे प्रस्ताव निधीअभावी प्रलंबित आहेत. या प्रकल्पांना चालना दिली जावी, अशी मागणी राणे यांनी विधानसभेत अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी केली.
हे प्रकल्प पाण्याचे संवर्धन तसेच मतदारसंघातील गावांसाठी सिंचन सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक आहेत. निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. यात जमिनीची धूप रोखण्यासाठी तसेच लगतच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी नद्या आणि नाल्यांच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, विहिरींचे बांधकाम आणि दुरुस्ती करणे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.