गोवा खबर : हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण बेपत्ता झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.

कुल्लूमधील निर्मद, सेंज, मलाना, मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटीने कहर केला. समेज खूडमध्ये (नाला) ढगफुटीमुळे दोघांचा मृत्यू झाला आणि 28 जण बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत केंद्राकडून सर्वतोपरी मदत
करण्याचे आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दुःख व्यक्त केले.

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक 212 मिमी पावसाची नोंद पालमपूरमध्ये आली. यानंतर चौरीमध्ये 203, धर्मशालामध्ये 183.2 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
