• १९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४ या कालावधीतल पिळर्ण येथील गोवा संग्रहालयामध्ये गोव्यातील कलाकारांचा सहभाग असलेले आर्ट इन्क. प्रदर्शन भरणार
• प्रदर्शन व विक्री दालनात आपली कलाकृती सादर करण्यासाठी ४७ दिव्यांग कलाकारांची निवड
गोवा खबर:गोवा दिव्यांगजन सक्षमीकरण खाते, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय, एनेबल इंडिया आणि आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा संग्रहालयामध्ये ‘आर्ट इन्क’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पिळर्ण येथील गोवा संग्रहालयामध्ये आयोजित या प्रदर्शनामध्ये राज्यातील आघाडीचे व उदयोन्मुख असे ४७ दिव्यांग कलाकार आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडणार असून या माध्यमातून कला क्षेत्रामध्ये वैविध्यतेचा आणि सर्वसमावेशकतेचा सोहळा साजरा करणार आहेत.
‘आर्ट इन्क’ हे प्रदर्शन १९ जुलै रोजी सुरू होणार असून प्रेक्षकांसाठी ते ४ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहेत. या प्रदर्शनात सहभागासाठी करण्यात आलेल्या आवाहनानंतर तब्बल ६५ दिव्यांग कलाकार आणि संस्थांनी सहभागाबाबत प्रतिसाद देत १५०हून अधिक कलाकृतींचे नमुने सादर केले होते. या प्रवेशिकांची छाननी करत त्यातून ४७ कलाकारांच्या १०० कलाकृतींची निवड या प्रदर्शनात मांडण्यासाठी करण्यात आली आहे. या ४७ कलाकारांपैकी काही कलाकार हे प्रतिथयश तर काही कलाकार प्रथमच अशा उपक्रमात सहभागी होत असून आपल्या कलाकृती प्रदर्शन व विक्रीसाठी सादर करणार आहे. या कलाकृतींच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे थेट या कलाकारांना मिळणार आहे.
या सहयोगी उपक्रमाच्या यशावर प्रकाश टाकताना राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “गोव्यातील दिव्यांग कलाकारांमधील प्रतिभा आणि सर्जनशीलता या कलागुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रथमच ‘आर्ट इन्क’ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. अधिक समावेशक कला समुदायाला चालना देणे आणि या कलाकारांना ओळख आणि पाठबळ मिळविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. दिव्यांग कलाकारांना त्यांची कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देऊन, हे प्रदर्शन त्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यास सक्षम करणार आहे. एकूणच, प्रत्येक नागरिकासाठी सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ असे स्थान निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.”
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा संग्रहालय यांच्यातील हा सहकार्य उपक्रम म्हणजे विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलांमध्ये समावेश करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. विविध दिव्यांग कलाकारांच्या उदंड
प्रतिसादामुळे, ‘आर्ट इन्क’ हा उपक्रम गोव्यातील कलासृष्टीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. अनोख्या अशा या प्रदर्शनामध्ये काही निवडक कलाकृती स्पर्शिक स्वरूपात (टॅक्टाइल) सादर करण्यात येणार असल्यामुळे व्यक्तींनाही या कलाकृतींचा रसास्वाद घेणे सुलभ होणार आहे.
प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व ४७ कलाकारांच्या वैविध्यपूर्ण कौशल्य स्तरांना प्रभावीपणे सादर करण्यासाठी हे प्रदर्शन दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे: पहिली श्रेणी ही प्रतिथयश कलाकारांसाठीची असून यामध्ये सात प्रस्थापित कलाकार सहभागी होतील, तर दुसरी श्रेणी ही ४० उदयोन्मुख कलाकारांची प्रतिभा सादर करणार आहे.
“‘आर्ट इन्क’ हे प्रदर्शन कलेच्या प्रदर्शनाबरोबरच दिव्यांग व्यक्तींमधील जिद्दी भावना आणि त्यांचे वास्तव मांडण्याचाही एक प्रयत्न आहे. या प्रदर्शनाशी संबंधित सर्वांसाठीच एक सुलभ अनुभव मिळण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. यासाठी आम्ही दिव्यांग कलाकारांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी, त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे सामावून घेण्यासाठी आणि हे व्यासपीठ सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ बनवण्यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत,” अशी माहिती पिळर्ण येथील गोवा संग्रहालयाच्या कार्यकारी प्रमुख आणि चिल्ड्रेन्स ऑर्ट स्टुडिओच्या सहसंस्थापिका शारदा केरकर यांनी दिली.
संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान सहाय्यक दृष्टिकोनाचा अवलंब करत ‘आर्ट इन्क.’च्या क्युरेटर, लेखिका आणि कला सल्लागार समीरा शेठ यांनी काळजीपूर्व या प्रदर्शनाची रचना केली आहे. या अनुभवाबाबत समीरा शेठ म्हणाल्या, “आर्ट इन्क.च्या कलाकारांसोबत त्यांचा क्युरेटर म्हणून उभे राहताना आणि या कलाकारांमधील सर्जनशीलतेला, प्रतिभेला न्याय देण्याची संधी मिळाली हा माझा मोठा सन्मानच आहे. आमची क्युरेशन प्रक्रिया अपवादात्मक दर्जाच्या कलाकृती सादर करण्यासाठी आणि कला रसिकांना आनंद देण्यासाठी समर्पित आहे. ‘आर्ट इन्क.’ प्रदर्शनातून दिव्यांग कलाकारांना पाठबळ, प्रोत्साहन देण्याबरोबरच सुलभ किमतीमध्ये कलाकृती प्राप्त करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.”
प्रदर्शनासाठी निवडलेल्या उल्लेखनीय कलाकृतींमध्ये, १८ वर्षीय सुफया पन्ना यांची ‘ड्रॅगन रिआल्म १’ (२०२३); 60 वर्षीय डायलन आर्थर यांची ‘क्राफ्ट्समन’ (२००२); १९ वर्षीय सहर्ष संतोष वायंगणकर यांची ‘कॉर्न ईगल’ (२०२४) आणि ‘फिशरवुमन’; २६ वर्षीय सर्वेश सुरेश नाईक यांची ‘कॅट इन द क्लासरूम’ (२०२४); १८ वर्षीय तनिश किनळकर यांची ‘सीनरी’ (२०२४); वेस्टिन गोवाच्या सहकार्याने पॅरालिम्पिक जलतरणपटू ग्रेगरी बर्न्स यांची ड्रिफ्टिंग थ्रू गोवा (२०२४); प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका फ्रेडरिका मिनेझिस यांची ‘ट्रिकी एलिफंट’ (२०२४); टीआयईएस (Towards Inclusion Everywhere in Society) द्वारे ‘स्टारी डेज’ (२०२४); आणि ३३ वर्षीय निगेल लाझारस डिसूझा यांची ‘फॉन्टेनहास’ (२०१८) या कलाकृतींचा समावेश आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा संग्रहालय यांच्यातील सहकार्याने कलेच्या माध्यमातून सर्वसमावेशकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे. या प्रदर्शनादरम्यान होणारे सर्व विक्री उत्पन्न कलाकारांना दिले जाणार असून, ‘आर्ट इन्क.’ हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींना सक्षम होण्यासाठी लाभदायक ठरण्याबरोबरच कलारसिकांनाही कलाकारांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करणार आहे.