गोवा खबर:गोवा विधानसभेचे सभापती तथा काणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर यांनी श्रमधाम ही संकल्पना यशस्वी केलेली आहे. गरजू व्यक्ती हा हताश, निराश, असाह्य असू नये या दृष्टिकोनातून त्यांनी ही संकल्पना काणकोण मतदारसंघातून सुरुवात केली होती आणि ही संकल्पना आता काणकोण मतदारसंघापूर्ती मर्यादित राहिलेली नसून ती संपूर्ण भारत देशात पसरलेली आहे आणि देशभरातून या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

सभापती रमेश तवडकर यांचे बलराम शिक्षण संस्थेमार्फत विद्यादानाचे पवित्र कार्य त्यांच्या संस्थेमार्फत घडत आहे आणि त्याचबरोबर आदर्श युवा संघाचा लोकोत्सव हा सुद्धा कष्टकरी समाज जीवनाला एक वेगळा आयाम देणारा लोकोत्सव आहे. ज्या लोकोत्सवातून कष्टकरी समाज जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली, यातून कष्टकरी समाज जीवनाचे ब्रँडिंग झालेले आहे अशा पद्धतीच्या परंपरा संस्कृतीचे जतन करणारा हा लोकोत्सव आहे. त्याचबरोबर श्रमधाम ही संकल्पना त्यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची व कार्याची दखल घेत भारत देशाचा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार मानला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारासाठी सभापती रमेश तवडकर यांच्या नावाची शिफारस गोवा सरकारने केंद्र सरकारकडे करावी आणि तशा पद्धतीचे पत्रव्यवहार संबंधित खात्याकडे नवचेतना युवक संघातर्फे करण्यात येणार, अशी मागणी नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केली.

नवचेतना युवक संघ पेडणे व संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्रमधाम या संकल्पनेवरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही मागणी केली.
चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गावस यांनी बोलताना सांगितले की, सभापती रमेश तवडकर यांचे कार्य हे अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना आसरा मिळालेला आहे. श्रमधाम या संकल्पनेतील त्यांचे कार्य हे निस्वार्थी भावनेचे असून प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.सर्वांच्या श्रमातून एखाद्या गरजू कुटुंबाचे घर उभे राहावे अशी आगळीवेगळी संकल्पना असून या संकल्पनेने अनेक निराधारांना आसरा देण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सुद्धा या पद्मश्री पुरस्कारासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे योग्य तो पत्रव्यवहार या संबंधित करावा, अशी मागणी केली.