Connect with us

गोवा खबर

गोवा शिपयार्ड मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवणार:मुख्यमंत्री

Published

on

Spread the love
गोवा खबर:जवळपास 55 वर्षे देशात काँग्रेसची सत्ता होती. पण त्यांनी देशवासीयांसाठी एकही योजना दिली नाही.  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक गावात रस्ता, घरात वीज, शौचालय, नळ जोडणी मिळाली. त्यामुळे आता तिसऱ्यावेळी मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन कमळाला मत देऊया. ‘अबकी बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार’ साकारण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या प्रचारासाठी मुरगाव तालुक्यातील वास्को व मुरगाव मतदारसंघात बुधवारी भाजपाच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, तुमचे आमदार नेहमीच तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवतात. गोवा शिपयार्डचा तुम्हाला होणारा त्रास लवकरच सोडवण्याचे मी आश्वासन देतो. मोदींनी आतापर्यंत देशातील जनतेच्या पाणी, वीज इ. समस्या सोडवल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर गोवा शिपयार्डसोबत एक बैठक घेऊन तुमच्या समस्या सोडवणार, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.
मोदी सरकारने गोव्याला अनेक विकास प्रकल्प दिले. गृह आधाराचे पैसे लोकांना वेळोवेळी मिळतात. ज्येष्ठांच्या बँक खात्यात प्रतिमहा २ हजार रुपये येतात. लग्न होणाऱ्या मुलींना लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत मिळते. डीडीएसएसव्हाय कार्ड आज प्रत्येकाकडे आहे. रेशन कार्डवर मिळणाऱ्या मोफत तांदळाचा कित्येक कुटुंबांना आधार होतो. मोदी सरकार या सर्व योजनांची गॅरंटी देते. काँग्रेस काळात लोकांना खायला अन्न नव्हते, पुरेशा सोयी सुविधा नव्हत्या. पण मोदी सरकारच्या काळात देशाची परिस्थिती बदलली आहे. आज भारतवासीयांना सुखाचे दिवस दिसत आहेत. विकसित भारत, नवभारत, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय मोदींना मत देऊया. आमच्या भावी पिढीसाठी मोदी सरकारला निवडून आणुया. अमेरिका आणि रशियापेक्षा आम्हाला पुढे जायचे आहे. हे शक्य होणार फक्त मोदींना मत दिल्यानंतरच. ‘आजादी का अमृतकाला’तील भारत बघण्यासाठी तुमचे एक एक मत महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
दक्षिण गोव्यात भाजपाला जिंकण्याची संधी आहे. भाजपाचे सरकार आल्यास मुरगाव तालुक्याचा विकास होईल. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे सौ. धेंपो यांना जिंकून देण्याची. भाजपाचे दोन्ही उमेदवार जिंकणार यात शंका नाही. पण तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री नेहमीच आम्हाला पाठिंबा देत आले आहेत, आता आमच्या पाठिंब्याची त्यांना गरज आहे. निवडून येणाऱ्या खासदाराकडे आमची भरपूर कामे असणार. त्यामुळे मोदी सरकारला मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणुया, असे आवाहन वास्कोचे आमदार श्री. कृष्णा (दाजी) साळकर यांनी केले.
भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो म्हणाल्या, भाजपाचे कार्यकर्ते नेहमीच सक्रिय असतात. तुमच्या मतांचा आम्हाला खूप आधार आहे. तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेमाने वागवले आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी महिलांना प्रोत्साहन दिले आहे. लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे, तर गोव्यात ५० टक्के. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकास झाला आहे. मोपा आणि दाबोळी विमानतळ, रस्ते – पूल  एवढ्या चांगल्या साधन-सुविधा मोदी सरकारने गोव्याला दिल्या आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी भाजपा काम करते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील गोवा ग्रामीण योजना, लाडली लक्ष्मी, बेटी बचाव बेटी पढाव, आरोग्य योजना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या ७ मे रोजी तुमचे मौल्यवान मत आम्हाला मिळणार याची खात्री आहे. मला मत देणे म्हणजे मोदींना बळकट करणे, असे सौ. धेंपो म्हणाल्या.