गोवा खबर:देशात निवडून आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी गोपनीयतेची शपथ घेताना आपण भारताच्या संविधानाशी बांधील असल्याची ग्वाही देत असतो. मात्र इंडि आघाडीचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी 1961 साली गोव्यावर भारताचे संविधान लादले गेल्याचे धक्कादायक आणि निषेधार्ह वक्तव्य आपल्या प्रचारादरम्यान केले आहे. या वक्तव्याने भारतीय संविधानाचा अनादर झालेला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कॅ. विरियातो यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र घोषित केले पाहिजे, अशी जोरदार मागणी मडगावचे आमदार श्री. दिगंबर कामत यांनी केली.
पणजी येथे भाजपाच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला श्री. कामत यांच्यासह प्रदेश सरचिटणीस श्री. दामू नाईक, माजी आमदार श्री. ग्लेन टिकलो, माजी मंत्री श्री. दिलीप परुळेकर उपस्थित होते.
गोव्यात भारतीय संविधान लागू झाले तेव्हा देशाचे पंतप्रधान कोण होते, असा सवाल करत आमदार श्री. दिगंबर कामत पुढे म्हणाले की, कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याशी काँग्रेस पक्ष सहमत आहे का याचा खुलासा पक्षाने केला पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधान लागू केले ते योग्य होते की अयोग्य, आणि काँग्रेसची याविषयीची भूमिका काय आहे, हेही स्पष्ट करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार श्री. दिगंबर कामत यांनी केली.
कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी तावातावाने केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेला आहे. यामुळे आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असा दावा ते करत असतील ते पूर्णपणे चुकीचे आहे. तो व्हिडिओ पाहून जनतेने आणि आयोगाने आपला निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार श्री. दिगंबर कामत यांनी केली.
प्रदेश सरचिटणीस श्री. दामू नाईक म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संविधानाचा आदर करणार असल्याचे छापण्यात आले आहे. पण खुद्द काँग्रेसचे उमेदवार संविधानाचा अनादर करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून पुढे नेलेले मुद्दे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले गेले आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा बोगस, दिशाभूल करणारा आणि गोमंतकीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. या जाहीरनाम्याचा आम्ही निषेध करतो, असे श्री. दामू नाईक म्हणाले. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील भाजपाचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान भाजपाने मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांच्याकडे या वक्तव्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. संविधानाच्या विरोधात वक्तव्य करून इंडि आघाडीचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषय भारतीय निवडणूक आयोगाकडे पोहोचवला जावा आणि कॅ. विरियातो यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.