गोवा खबर:भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी यंदाची निवडणूक महत्त्वाची आहे. भारताला जगातील अव्वल राष्ट्र बनवण्याचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. भाजपाचे 18 आमदार आज इथे उपस्थित आहेत. भाजपा कार्यकर्ते पूर्ण काम करणार आणि दोन्ही जागा भाजपाला जिंकून देणार याचा विश्वास आहे. मतदारांनी भाजपावर नेहमीच विश्वास ठेवलाय, आणि यावेळी तो कायम ठेवणार याचाही मला विश्वास आहे. यावेळी विक्रमी मतदान होऊन अबकी बार ४०० पार म्हणत उत्तरेतून श्री. श्रीपाद नाईक आणि दक्षिणेतून सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो निवडून येणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
भाजपाचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. श्रीपाद नाईक यांनी मंगळवारी पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री श्री. विश्वजीत राणे, आमदार सौ. जेनिफर मोन्सेरात उपस्थित होते.
अर्ज सादर करण्यापूर्वी भाजपाचे उत्तर गोवा मतदारसंघातील मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित हितचिंतकांनी श्री. नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपा कार्यालयाजवळ हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अबकी बार 400 पार, श्रीपाद भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे यांच्यासह भाजपा सरचिटणीस श्री. दामू नाईक, सौ. सुलक्षणा सावंत, उपसभापती श्री. जोशुवा डिसोझा, मंत्री श्री. नीळकंठ हळर्णकर, मंत्री श्री. रोहन खंवटे, मंत्री श्री. बाबूश मोन्सेरात, मंत्री श्री. विश्वजीत राणे, मंत्री श्री. गोविंद गावडे, आमदार श्री. जीत आरोलकर, आमदार श्री. प्रवीण आर्लेकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार सौ. डिलायला लोबो, आमदार सौ. जेनिफर मोन्सेरात, आमदार श्री. केदार नाईक, आमदार श्री. मायकल लोबो, आमदार श्री. रुदॉल्फ फर्नांडिस, आमदार श्री. राजेश फळदेसाई, आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, आमदार सौ. देवीया राणे, भाजपचे पदाधिकारी, विविध पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसवेक, विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य आदी यावेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना श्री. नाईक म्हणाले, मी विकासाबद्दल पुन्हा बोलणार नाही. मी गेल्या 25 वर्षांत केलेला विकास दोन दिवसांत लोकांच्या हाती ठेवणार आहे. दिल्लीत मला विचारतात, की तुम्ही 5 वेळा सतत निवडून येण्यामागचे गुपित काय. मी त्यांना एकच उत्तर देतो की, माझे कार्यकर्ते, गोव्याची जनता यांनी माझ्यावर वेळोवेळी दाखवलेल्या विश्वासामुळे मला हे शक्य झाले आहे. भाजपाने नेहमीच राष्ट्राच्या विचाराला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने केलेल्या त्यागातून आज भाजपाची मुळे राज्यात घट्ट झाली आहेत. भाजपाने केलेला विकास मोजता येणार नाही. राज्याला पुढे न्यायचे असेल तर मोठ्या मतधिक्क्याने पुन्हा आम्हाला निवडून द्या, जेणेकरून विरोधकांची तोंडे बंद होतील. भाजपा पुन्हा जिंकून आला तर विरोधकांची तोंडे आपणच बंद होतील. भाजपाने प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रभक्तीकडे जोडून दिले आहे. काँग्रेसने आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला. आज काँग्रेसवाले टीका करतात की लोकशाही धोक्यात आहे. पण लोकशाहीला धोक्यात घालणारे काँग्रेस होते. अशा परिस्थितीत काँग्रेसला विरोध करण्यासाठी भाजपा समोर आली. काश्मिरात भारताचा तिरंगा फडकत नव्हता, तो भाजप सरकारने फडकावून दाखवला आहे. रामजन्मभूमीत रामलल्ला परतले आहेत. हे सगळे शक्य झाले भाजपा कार्यकर्त्यांमुळे. तुमच्यामुळे भाजपाची शक्ती वाढते. तुमच्यावर विश्वास आहे की, यावेळी दोन्ही जागा भाजपा जिंकणार, असे ते म्हणाले.