Connect with us

गोवा खबर

गोवा राज्य दिव्यांगजन कार्यालयाचे पणजी शहरात प्रवेशसुलभता वाढवण्याचे उद्दिष्ट

Published

on

Spread the love
गोवा खबर:राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय, रॅम्प माय सिटी आणि एनेबल इंडिया यांच्याद्वारे पणजीमध्ये सर्वसमावेशक प्रवेशसुलभता प्रकल्पास सुरुवात
दिव्यांग व्यक्तींसमोरील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने, रॅम्प माय सिटी आणि एनेबल इंडिया यांच्या सहकार्याने पणजी शहरातील विविध आस्थापने, हॉटेल आणि शोरूम दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभ बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
याबाबत गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी नमूद केले की, “पणजी शहरामध्ये विविध आस्थापने, हॉटेल, दुकाने अशा ठिकाणी दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभतेची निश्चिती करण्याकामी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयास पणजी महापालिकेचे सहकार्य मिळत आहे.”
दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभ अशा रॅम्पवर वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने दिव्यांगजनांसाठी कशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अडथळे व समस्यांना सामोरे जावे लागते यावर प्रकाश टाकताना श्री. पावसकर यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, “एका विशिष्ट घटनेत, एका उभ्या असलेल्या मोटारसायकलमुळे रॅम्पवरील सिमेंटचा थर फुटून हा रॅम्प खराब झाला.
दिव्यांगजनांसाठी ही जागा राखीव असल्याच्या स्पष्ट खुणा करूनही हे घडले.”
श्री. पावसकर म्हणाले की, “अशा घटनांमुळे समाजात जागरुकता, जाणीव वाढवण्याची गरज आहे. तसेच अशा राखीव, प्रवेशसुलभ स्थानांवर नियमांचे काटेकोर व सकारात्मकपणे पालन करणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे. बदलाच्या प्रक्रियेस वेळ लागतो. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या माध्यमातून सार्वजनिक जागरुकता वाढवण्याचे, दिव्यांगजनांसाठी सर्वसमावेशकता आणि प्रवेशसुलभतेला प्रोत्साहन देण्याचे प्रभावी साधन म्हणून काम होईल. सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये, प्रवेशसुलभता निश्चित करण्याबाबत व्यापक प्रयत्न राबवले जात आहेत.”
यावेळी त्यांनी नमूद केले की, यावर्षी पर्वरी येथील विधानसभा संकुल दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभ करण्यात आले आहे. तसेच विविध शासकीय इमारतींमध्येही दिव्यांगजनांठी प्रवेशसुलभ रॅम्प विकसित केले जात असून दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभ व अनुकूल बदल घडवण्यात येत आहेत.
सर्वांसाठी प्रवेशसुलभतेच्या वचनबद्धतेवर जोर देत श्री. पावसकर पुढे म्हणाले, “राज्य सरकारचे उपक्रम आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी प्रकल्पांच्या पाठबळातून दिव्यांगजनांसाठी सर्वत्र प्रवेशसुलभता वाढवण्याच्या चळवळीमधये गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय नेहमीच अग्रभागी राहिले आहे.”