गोवा खबर:भारतीय वस्त्र परंपरेला हजारों वर्षांचा इतिहास आहे.महाभारता मध्ये देखील पीतांबर वस्त्राचा उल्लेख आढळतो.आपल्या या वस्त्र संस्कृतीला गत वैभव मिळवून देण्यासाठी हातमाग उद्योगातून निर्माण झालेली वस्त्रे आपण फक्त उत्सवा पुरती नाही तर नियमित आयुष्यात देखील वापरली पाहिजेत,असे आवाहन पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी केले.
गोव्यातील हातमाग उद्योग आणि कारागिरांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ कशी मिळवून देण्यासाठी ऊर्जा ट्रेनिंग आणि रिसर्च अकादमी, नारी सोच वास्को आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने ‘बुनाई उत्सव 2023’ या महोत्सवाचे आयाेजन राय-मडगाव येथे करण्यात आले आहे.त्याच्या उद्धाटन सोहळ्यात मुख्य प्रवर्तक म्हणून सावंत बोलत होत्या.
सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते तूळशीला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.यावेळी ऊर्जा ट्रेनिंग आणि रिसर्च अकादमीच्या डॉ. स्नेहा भागवत आणि तेजश्री पै,नारी सोचच्या सुविना बाणावलीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘बुनाई उत्सव 2023’ हा कार्यक्रम शनिवारी राय येथील व्ही.एम.साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हाॅस्पिटलिटी या संस्थेच्या सभागृहात पार पडला.

यावेळी हातमाग विणकारांच्या प्रश्र्नावर चर्चा आणि हँडलूम वस्त्रांवर आधारित फॅशन शो पार पडला.
लेखिका शेफाली वैद्य या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.वैद्य यांनी हातमाग उद्योगाच्या वाटचालीचा आढावा घेऊन हातमाग उद्योगात नवीन पीढी आल्यास या उद्योगाला चालना मिळेल असे प्रतिपादन केले.

समारोप सोहळा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.आमदार साळकर यांनी नारी सोच आणि डॉ. स्नेहा भागवत यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुणबी साडीला ज्या पद्धतीने चालना दिली त्यामुळे कुणबी साडीला प्रतिष्ठा मिळू लागली असल्याचे सांगत साळकर यांनी उपस्थितांना हातमाग उद्योगाला हातभार लावायचे आवाहन केले.
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सध्याच्या फॅशनच्या दुनियेत जुन्या वस्त्र परंपरेला स्थान मिळू लागले असल्याचे सांगत महिलांनी हातमाग उद्योगात स्वतःहून पुढे यावे त्यांना सगळ्याची निश्चित साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

सेलिब्रेटी अँकर रुचिका डावर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या उपक्रमाला रोटरी क्लब मडगाव सनराइज आणि सम्राट क्लबचे सहकार्य लाभले आहे.हा हॅण्डलूम फॅशन शो नारी सोचच्या अध्यक्ष सुविना बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.नारी सोच या ब्रैंडच्या माध्यमातून बाणावलीकर हैण्डलूमच्या उत्पादनांना प्रमोट करत आहेत.
यावेळी आयोजित फॅशन स्पर्धेत फोंडा येथील उरमेषा गावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. फोंडा येथील पूर्वा चोडणकर आणि कुंकळ्ळी येथील ऋतुजा लोटलीकर या फर्स्ट रनर अप ठरल्या.फोंडा येथील श्रद्धा शिरोडकर सेकंड रनर अप ठरल्या.विजेत्याना रोख रकमेची पारितोषिके आणि चषक देऊन गौरवण्यात आले.बुनाई उत्सवाला 500 हुन अधिक लोक उपस्थित होते..