गोवा खबर:गोव्यातील हातमाग उद्योग आणि कारागिरांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ कशी मिळवून देण्यासाठी ऊर्जा ट्रेनिंग आणि रिसर्च अकादमी, नारी सोच वास्को आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने ‘बुनाई उत्सव 2023’ या महोत्सवाचे आयाेजन राय-मडगाव येथे करण्यात आले आहे.
‘बुनाई उत्सव 2023’ या महोत्सवाचे शनिवार 14 ऑक्टोबर रोजी राय येथील व्ही.एम.साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हाॅस्पिटलिटी या संस्थेच्या सभागृहात होणार आहे.
या महाेत्सवात हातमाग विणकारांच्या प्रश्र्नावर चर्चा करण्याबरोबरच हँडलूम वस्त्रांवर आधारित फॅशन शो होणार आहे.पद्मीनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत या उपक्रमाच्या मुख्य प्रवर्तक असून दुपारी अडीच वाजल्यानंतर या उत्सवाला सुरुवात होणार आहे. लेखिका शेफाली वैद्य या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
सेलिब्रेटी अँकर रुचिका डावर या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहेत.या उपक्रमाला रोटरी क्लब मडगाव सनराइज आणि सम्राट क्लबचे सहकार्य लाभले आहे.हा हॅण्डलूम फॅशन शो नारी सोचच्या अध्यक्ष सुविना बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.नारी सोच या ब्रैंडच्या माध्यमातून बाणावलीकर हैण्डलूमच्या उत्पादनांना प्रमोट करत असतात.
तर समारोप सोहळ्याला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर हे उपस्थित रहाणार आहेत.या उत्सवाबद्दल माहिती देताना उर्जा अकादमीच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले, गोव्याची कुणबी साडी आणि हातमागावर विणलेल्या इतर वस्तू यावर या उत्सवात प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.
या वस्त्रांना नव्या फॅशनकडे कसे जोडता येणे शक्य आहे आणि या व्यवसायात आणखी काय नाविन्य आणता येणे शक्य आहे यावर परिसंवाद होणार असून त्यानंतर हँडलूम वस्त्रधारण केलेल्या महिलांचा फॅशन शो होणार असून त्यात बारा महिला सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.