गोवा खबर:गोवा राज्य जैवविविधता मंडळाने पावसाळ्यात जंगतील रोयणींवर उगवणारी अळंबी मोठ्या प्रमाणात न काढण्याची लोकांकडे मागणी केली आहे. अळंब्याच्या जातींचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी रोयणींवर पन्नास टक्के अळंबी ठेवावी. जंगलामध्ये रोयणींवर उगवणारी अळंबी मोठ्या प्रमाणात तोडल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
आज अनेक अळंब्याच्या जाती नष्ट झालेल्या आहेत. तसेच पूर्णपणे वाढ न झालेली लहान अळंबी काढल्याने पुढील वर्षामध्ये अळंबी उगविण्याचे प्रमाण कमी होत जाते. पुढच्या वर्षी अळंबी येण्यासाठी पुर्णपणे वाढ झालेली अळंबी त्यावर कुजली पाहिजे आणि मातीत विघटित झाली पाहिजे.
तसेच अळंब्याचे लहान कळे काढण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने माकड तापा सारखा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
खाजगी वन मालकांनीही आपल्या वनात उगवणाऱ्या अळंब्याच्या जातीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे असेही मंडळाने आवाहन केले आहे.