Connect with us

गोवा खबर

आगामी निवडणुकीत भाजपला ३५० जागा मिळतील  : सी. टी. रवी

Published

on

Spread the love
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने गेल्या 9 वर्षात देशाचा कायापालट केला आहे.  जनतेला याची माहिती आहे. यामुळे 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 350 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा भाजपाचे इनचार्ज सी. टी. रवी यांनी व्यक्त केला.  
भाजपाच्या येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट- तानावडे, प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.
सी. टी. रवी म्हणाले , 2012 पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला धोरण लकवा मारला होता.  यामुळे 2004 ते 2014 या दहा वर्षात देश पिछाडीवर गेला.  पण 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाने प्रत्येक क्षेत्राचा विकास केला आहे.  भाजपाने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या सर्वांगीण विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने देशभर महा संपर्क उपक्रमाचे आयोजन केले आहे.  उद्या 13 पासून गोव्यात जनसंपर्क मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात तुलना करायची झाल्यास कॉंग्रेस म्हणजे स्कॅम आणि भाजपा म्हणजे स्कीम असे करता येईल, अशी खिल्ली त्यांनी उडवली. भाजपा हा अंत्योदय तत्त्वावर काम करणारा आणि राष्ट्र प्रथम या भावनेने काम करणारा पक्ष आहे.  यामुळेच भाजपाने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या.  आणि त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. तसेच परराष्ट्र नीती ठरवताना केवळ आणि केवळ भारताचा विचार केल्याचे रवी म्हणाले.
आज आपल्या देशात लोकशाही आणि परिवारवाद यांच्यात संघर्ष सुरू आहे.  भाजपमध्ये लोकशाहीला सर्वोच्च स्थान आहे तर विरोधी पक्षांत केवळ परिवारातील लोक आहेत  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा प्रामाणिकपणा आणि विरोधकांचा भ्रष्टाचार आज आमनेसामने आले आहेत.  तुष्टीकरण आणि सबका साथ सबका विकास यांच्यात लढाई सुरू आहे.  विरोधक स्वार्थासाठी एकत्र येण्याची भाषा करत आहेत.  कोणीही कितीही प्रयत्न केले तरी 2024 च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सी. टी. रवी यांनी देशाला  विश्वगुरु करण्याचे भाजपाचे स्वप्न असल्याचे सांगितले.