Connect with us

गोवा खबर

मोदींच्या कार्यकाळात देशाची प्रतिमा उंचावली :डॉ.भागवत कराड

Published

on

Spread the love
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकासकामे आणि सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आणि पत्रकार मित्र तसेच प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यासाठी मी येथे आलो आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.  भागवत कराड यांनी केले. 
भाजपाच्या येथील मुख्यालयात आयोजित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट- तानावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, कृषी मंत्री रवी नाईक उपस्थित होते.  यावेळी शेट- तानावडै यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला.  आणि केंद्रीय मंत्री डॉ.  कराड यांची ओळख करून दिली.  मुख्यमंत्री डॉ.  सावंत यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ.  कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पनेची माहिती सर्वाना  व्हावी यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  26 मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक घटनेस 9 वर्षे पूर्ण झाली.  पंतप्रधान मोदी यांनी देशाचा आणि लोकांचाही विकास केला.  देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा बदलली.  2014 पूर्वीचा भारत आणि आजचा भारत यात खूप मोठे अंतर असल्याचे डॉ.  कराड म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सबका साथ, सबका विकासाचा नारा दिला.  नंतर यात सबका विश्वास याचा समावेश केला.  मोदींनी केवळ देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला विश्वास देण्याचे काम केले आहे, असे डॉ.  कराड म्हणाले.  केंद्रातील 2014 पूर्वीचे सरकार एका कुटुंबाच्या इशाऱ्यावर चालत होते. देशाचा कारभार रिमोट कंट्रोल द्वारे सुरू होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
देशात पहिल्यांदाच गरिबांच्या कल्याणाचे पर्व सुरू झाले आहे.  सर्व सामान्यांसाठी विमा सुरक्षा, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, धूर मुक्त स्वयंपाक घर, शिक्षण, कृषी आणि आरोग्य क्षेत्रासाठी विविध योजना आणि सबसिडी देण्याचे काम भाजपाने गेल्या 9 वर्षांत केले आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.  व्यापार, उद्योग वाढीसह विमानतळांचा विकास आणि संख्येत वाढ, सर्व राज्ये एकमेकांना जोडण्यासाठी महामार्गाचे काम, जल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यासह भाजपा सरकारने देशात रेल्वे वाहतुकीत प्रचंड सुधारणा केल्या आहेत.  याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीने देशातील विकासकामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. भागवत कराड यांनी राज्यातील संपादक, मुख्य प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.  तसेच त्यांच्या विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली.