जी२० प्रतिनिधींसाठी या नियोजित सफरीतून या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न
गोवा खबर: जी२०च्या चौथ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीस येणाऱ्या निमंत्रित प्रतिनिधींसाठी जी२० गोवा आणि भारतीय पुरातत्व विभागाचे गोवा परिमंडळ यांच्या वतीने एका विशेष सफर उपक्रमाचे आय़ोजन केले जाणार आहे. गोव्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या जुने गोवे येथील तीन स्मारकस्थळे आणि पुरातत्व विभागाचे संग्रहालय या स्थळांना भेट देऊन या प्रदेशातील श्रीमंत सांस्कृतिक वारशाचा अनुभव २२ जून २०२३ रोजी नियोजित या सफरीमधून जी२०च्या प्रतिनिधींना मिळणार आहे.
भेट ही सुलभ व कटकटमुक्त असावी या निकषांवर या सफरीसाठीच्या भेटस्थळांची निवड करण्यात आली. गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेट या स्थळाच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असून १९८६ साली कठीण व क्लिष्ट अशा निकषपातळ्यांमधून या स्थळाचा समावेश केले गेला होता. या वारसास्थळाचे महत्व पाहून भारत सरकारने जी२० प्रतिनिधींच्या भेटीसाठी या स्थळाची निवड केली आहे.
वारसास्थळे व संग्रहालय भेटीचा एक भाग म्हणून जी२०चे हे प्रतिनिधीमंडळ जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, सेंट कॅथ्रेडल, सेंट्र फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च, गोवा पुरात्तव संग्रहालय या ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांना भेट देणार आहे.

प्रत्येकी ४५ प्रतिनिधींचा एक गट याप्रमाणे एक तीन गट या सफरीमध्ये सहभागी होणार आहेत. पहिल्या गटाचा दौरा सकाळी १० वाजता, दुसऱ्या गटाचा साडेदहा वाजता आणि तिसऱ्या गटाचा दौरा ११ वाजता सुरू होणार आहे.
याबाबत जी२० गोवाचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज म्हणाले, “जी२० बैठकांचे आयोजन करण्याबरोबरच जी२० निमंत्रित प्रतिनिधींना इतिहास, वारसा आण संस्कृती बाबत गोव्याचे स्थान व महत्व किती अढळ आहे याची जाणिव करून देणेही तितकेच महत्वाचे आहे. या सफरीचे नियोजन सखोल अभ्यास करून करण्यात आले असून या भेटीतून निमंत्रितांना आयुष्यातील संस्मरणीय स्थळांपैकी एका स्थळाला भेट दिल्याची आठवण येथून घेऊन जायला मिळणार आहे. या भेटीच्या आयोजनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या गोवा परिमंडळाकडून मोठे सहकार्य मिळाले आहे.”
भारतीय पुरातत्व विभाग गोवा परिमंडळाच्या वतीने जी२० निमंत्रितांचे भव्य स्वागत केले जाणार असून ठिकठिकाणी स्वागतफलकही लावण्यात येणार आहेत. “प्रत्येक गटाची सफर सुमारे दोन तास चालणार असून एका
वेळेस एकच गट एका स्थळास भेट देणार आहे. यामुळे प्रत्येक प्रतिनिधीला या वारसा स्थळांचे व्यवस्थित दर्शन घेऊन तेथील ऐतिहासिक तसेच वास्तुकलेचे महत्वही जाणून घेता येणार आहे,” अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोवा परिमंडळाचे अधीक्षक पुरातत्व तज्ञ हेमसागर ए. नाईक यांनी दिली.
सुलभ व अचूक सफरीसाठीची तयारी सुरू आहे. या पुरातन स्थळांची स्थिती योग्य ठेवत पाहुण्यांना या ऐतिहासिक सफरीचा अनुभव दिव्य असा ठरावा यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोवा परिमंडळ आणि स्थानिक प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. या सर्व स्थळांचे छत तसेच भित्तीकामाचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून बासिलिका ऑफ बॉम जीझस आणि सेंट कॅथेड्रल संकुलातील बगिचांमध्येही सुधारणा काम सुरू करण्यात आले आहे. सर्व चर्चमधील प्रवेशद्वारांची दुरुस्ती-डागडुजी करून रंगकाम करण्यात आले आहे. तसेच विश्रामखोल्यांचीही डागडुजी करण्यात आली असून अतिरिक्त बायो-टॉयलेट ब्लॉक उपलब्ध करण्यात येत आहेत. दिशादर्शक फलक, माहिती फलक, सांस्कृतिक सूचनाफलक, स्वागतफलक उभारणीचेही काम सुरू आहे. तसेच या परिसरात कुंपणभिंतीचे विद्युतीकरण, रंगकाम, हरितजाळी बसवणे, लँडस्केपिंग आदी काम हाती घेण्यात आले आहे. तसेच प्रमुख ठिकाणांवर युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे प्रमाणपत्रही ठळकपणे दिसेल अशा प्रकारे लावण्यात आली आहेत. या वारसास्थळांच्या संवर्धानाचे काम अचूकपणे होण्यासाठी तसेच या वास्तू नेहमीच टापटीप राहाव्यात यासाठी व्यापक प्रयत्न व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास किंवा अचनाक पाऊस आल्यास त्यापासून संरक्षण होण्यासाठी जी२० प्रतिनिधींसाठी खास छत्र्यांचीही सोय करण्यात येणार असून पेयजल सुविधाही तत्परतेने उपलब्ध करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाअंतर्गत असलेल्या इंडिया टुरिझम संस्थेच्या वतीने परवाना दिलेले प्रादेशिक स्तरीय मार्गदर्शक जी२० प्रतिनिधी मंडळासमवेत उपलब्ध असणार आहेत.
या सर्व मार्गदर्शकांसाठी १९ एप्रिल २०२३ रोजी पाटो-पणजी येथील पर्यटन भवनामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोवा परिमंडळाच्या वतीने एका खास मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मार्गदर्शकांकडे ऐतिसाहिक तसेच वारसा स्थळांबाबत आवश्यक ज्ञान व माहिती असल्याची खात्री करून घेण्यात आली.
या ऐतिहासिक स्थळांची सर्वोच्च सुरक्षा व संवर्धन करण्याच्या उद्देशाने जी२० गोवा आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोवा परिमंडळाच्या वतीने योग्य काळजी घेण्यात येत आहे. गोव्यातील महत्वाच्या स्मारक स्थळांचा ऐतिहातिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेचा वारसा अनुभवण्याचे संस्मरणीय क्षण या भेटीतून जी२० प्रतिनिधींना मिळणार आहेत.
गोव्यातील कला, संस्कृती व इतिहासाची माहिती व ज्ञान घेत वैविध्यपूर्ण पर्यटनाचा अनुभव मिळावा यासाठी उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील महत्वाच्या स्थळांनाही भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील स्थळांचे समावेश करण्यात आला आहे: भारतीय जकात आणि जीएसटी संग्रहालय-पणजी, ख्रिश्चन कला संग्रहालय-जुने गोवे, श्री विजयदुर्गा मंदिर, ट्रॉपिकल स्पाइस प्लँटेशन-फोंडा, पिएदाद चर्च-दिवार, श्री सप्तकोटेश्वर मंदिर परिसर, फोंतेन्हास, मळा, साव टोम, पणजी, चर्च चौक, राज भवन, दोना पावला जेटी, रेईश मागूश किल्ला, आग्वाद किल्ला तुरुंग संग्रहालक-सिकेरी, कासा फिगेरेदो-लोटली, गोवा चित्र संग्रहालय-बाणावली, कोलवा बीच, श्री महालसा नारायणी मंदिर-वेर्णा, फाझेना कॅज्युलो लिकर डिस्टिलर्स, उतोर्डा बीच, तेरेखोल किल्ला आणि श्री मोरजाई मंदिर-मोरजी.