गोवा खबर: गोवा सरकारने लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १३५ बी नुसार बुधवार दिनांक १० मे २०२३ रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी “मतदान दिवस” म्हणून कर्नाटक राज्याच्या मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम १३५-बी नुसार कोणत्याही व्यावसायिक व्यापारी, औद्योगिक आस्थापनांमध्ये किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या आणि लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या दिवशी मतदानासाठी सुट्टी दिली जाते.


कर्नाटक हे शेजारील राज्य असल्याने गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील मतदार आहेत आणि कर्नाटकच्या सीईओ कार्यालयाकडून मतदानाच्या दिवशी कर्नाटक राज्याचे मतदार असलेल्या कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याचा अनुकूल विचार करण्यात आला.

नुकत्याच गोवा राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनेही संबंधित राज्यामध्ये काम करणाऱ्या गोवा राज्यांच्या मतदारांना लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी समान अधिसूचना जारी केली होती.